Sunday 16 December 2012

राधा

मोरपीस जणू फिरते तनी, 
वेणू नाद हा पडता कानी, 

काहूर मनात, अन हुरहूर आगळी 
मोहरते आठवता, छबी सावळी

थरथरते अधर, लाली गाली  
किंचित लाज, अधीर नयनी 

ललना साजिरी, नटली सजली  
शाम सख्यावर, आणिक भाळली

बावरे मन, अन आशा कोवळी 
मिलनास आसुसली, राधा भोळी  

पाहून अधीर राधा, बोले सखी 
"होईल बोभाटा ग गोकुळी!",

नयनी पाणी, मिटे पापणी 
अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!!


                                                                                               ... रेश्मा आपटे 





Friday 23 November 2012

पाऊस

आज खूप दिवसांनी मी एकटी निवांत घरी होते. दिवेलागणीला देवासमोर समई  लावली आणि खिडकीतून डोकावले तर गार वार्याची एक झुळूक अंगाला अलगद स्पर्शून गेली. मावळतीच्या छटांनी आकाश सजल होत. त्यातच काही काळे ढग अवकाशात मुक्त संचार करत होते. वार्याचा वेग वाढला तशी झाडेही डोलू लागली. काही पिकली पाने उतरवून स्वत:चा भर हलका करू लागली. मावळतीच्या देखाव्याने सजलेल आभाळ अचानक रूपड पालटू लागल. काळी चादर पांघरलेल्या आभाळातून एक लख्ख वीज आभाळ कापत गेली, आणि पाठोपाठ चार-दोन थेंब धरणीवर सांडले आणि लुप्त झाले. त्याना पाहायला की काय कोण जाणे मागोमाग असंख्य थेंब ढगांतून मुक्त झाले. लहान मुलीसारखी मी खिडकी बाहेर हात काढून ते थेंब झेलायचा प्रयत्न करत होते.

माझा तो पोरखेळ मला थेट शाळेत घेऊन गेला. भिजायला मिळव म्हणून मुद्दाम छत्री विसरणारी मी, मग शाळेतून घरी आल्यावर आईचा ओरडा खायचा तोही पाऊस बघत. मग हळू हळू मोठी होत गेले, तशी पाऊस खूप काही शिकवत गेला. आईचा डोळा चुकवून पावसात ओरडत नाचत फिरणार्या मला कॉलेज मध्ये गेल्यावर त्या थेंबांशी गुज-गोष्टी कारण अधिकच आवडू लागल. मग हळू हळू ते थेंब अनुभवण आणि पडणाऱ्या पावसाचा तो आवाज मनात साठवण अस एक आगळच खूळ लागल. या पावसाने मग कधी खूप खूप स्वप्न दाखवली, त्या स्वप्नात मला झुलवल. काही चेहेरे त्यांच्या सहवासातले पावसातळे  सुंदर क्षण आज मला खूप प्रकर्षाने आठवत राहिले. काही विसरली वाटणारी माणस कशी काल-परवाच हातात-हात गुंफून चालत असल्यासारखी खरी खरी वाटायला लागली. ते चेहेरे, पावसात चिंब करणाऱ्या त्या आठवणी, मोहरणारे क्षण, आणि अचानक आठवली.. ती स्वप्न अशाच पावसात विस्कटलेली. आणि मग पावसानेच मदतीला येऊन डोळ्यातल्या पाण्यात मिसळून टाकलेले थेंब,, सार काही डोळ्यासमोर येत राहील. पाऊस बाहेर कोसळतच होता. मी ते पाणी पाहत होते. सतत कोसळणाऱ्या धारातून एक बाईक भरधाव जाताना दिसली आणि एक भिजरी संध्याकाळ हलकेच मनावर तरंगली, पुन्हा एकदा पावसाने मला हसवलं. तेव्हा सुंदर सुंदर वाटणारा पाऊस आजही रिमझिम करत मला गुदगुल्या करत होता. वाकुल्या दाखवत माझ्याबरोबर हसत होता.

ते आठवणींच चलचित्र पाहताना, वाटल मी स्वत:ला नव्याने ओळखतेय. काही आठवणींवर हसतेय तर काहीं आठवणींकडे एक समजूतदार नजर टाकून पुढे सरतेय. हे सगळ सुरु असताना माझा जुना पोरखेळ सुरुच होता. त्या टपोऱ्या थेंबाना ओंजळीत साठवायचा खेळ!!  पण ते टपोरे थेंब हातावर विसावले की कितीही हवे-हवेसे वाटले तरी ते हातून निसटून जात होते, भरली भरली वाटणारी ओंजळ हलकेच रीती करून जात होते. पण अचानक जाणवलं की ते ओंजळीतून निसटतानाही तळव्यांवर एक सुखद ओलावा ठेवून जातायत. त्या अनुभवाची अनुभूती आणि आठवणींची हवी-हवीशी वाटणारी खून हळुवार मागे ठेऊन जातायत. सरींतून कोसळणार ते पाणी माझ्या थेट मनापर्यंत पोहोचून मला तृप्त.. तृप्त करून गेल. पाऊस आज पुन्हा नव्याने शिकवून गेला.

हसवणारा, कधी रडवणारा, तर कधी रडवल्यावर कवेत घेणारा पाऊस... त्याच न माझ नातच वेगळ आहे. पाऊस म्हणजे पाणी...  मला भुरळ घालणारी एकमेव गोष्ट : पाणी! नदीच असो वा समुद्राचं, झऱ्यातून  खळाळणार, धबधब्यातून कोसळणार, किंवा अगदी नळातून वाहणार असो मला पाणी नेहमीच भुरळ घालत आणि सगळ्यात भावणार पाणी म्हणजे पावसाच्या स्वरूपात येऊन चिंब चिंब करणार. मला पाणी भावत कारण त्याला गती असते. ते कधी थांबत नाही चांगल वाईट सगळ आपल्यात सामावून घेत. पाऊस, पाणी वाहत असत अविरत आणि शिकवत असत जगण्याची प्रक्रीया. जे हव ते घेऊन आणि नको ते नेमक काठाला ठेऊन सतत गतिमान राहायचं. हातून निसटलेल्या क्षणांना आठवणीत जपायचं आणि त्या अनुभवातून शिकत राहायचं.!!!

                                                                                           ... रेश्मा आपटे

Tuesday 9 October 2012

मी आणि तू


मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड
तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड..

मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग
तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग..

मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र 
तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र..

मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती..
माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य!!

                                ... रेश्मा आपटे 

Thursday 30 August 2012

काही बोललो ..बरच काही बोललो नाही ..
काही शब्द सापडले . काही शोधतच बसलो ..
विचारांत फक्त घोळत बसलो ..झाले इतकेच की  ..
मी आज पुन्हा तुझ्याशी बोललो..


ओलाव्याची ती वाक्ये तर काही सापडली नाही ..
ठेवलेली टोपण नावे येहूनही आली नाही..
काही शब्द आठवून स्वतः शीच हसलो ..झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

शब्द काही आपलेसे वाटले, अर्थ मात्र अनोळखी भासले
तीच तू, तोच आवाज, बोलणे मात्र परके वाटले
पुरा.. पुरा मी आठवणीत हरवलो ... झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

न बोलता सगळ ओळखणारी तू ..
आज मात्र 'आणि, अजून ,बोल ' म्हणत राहिलीस ...
थांबलेले शब्द..,अन वाढलेली अंतरे दाखवत होतीस..
न कळे , मी मात्र नवीन नात्याला नव नाव शोधात बसलो ..

झाले इतकेच की , मी आज तुझ्याशी बोललो


बोलायचे खूप होते, अनेक जाब विचारायचे होते
शब्द सगळे अडकत होते, अर्थ डोक्यात शिरत नव्हते
नकळत ती अंतरे सांधायला धावलो .. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


अस्फुट हास्य, बटांशी खेळणं, तुझं निरागस लाजण,
ती भांडण, ते रुसणं, चाफेकळी बरोबर तुझं खुलण
सार आठवून तृप्त हसलो.. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


चाफा आजही बहरलाय, सुवास माझ्यात भरून रहीलाय
पण आजचा क्षण आपला म्हणून उमलत नाहीये
हा क्षण स्वप्नात उमलवत राहिलो ... झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


                                          ... रेश्मा आपटे आणि वैभव भानूशाली 

Friday 17 August 2012

नकुशा


पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे मला पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. अशीच एक पत्रकार मुंबईच्या मध्य रेल्वे मध्ये हल्लीतच भेटली. खरतर संध्याकाळच्या वेळी शांतपणे झोपून किंवा फारतर गाणी ऐकत किंवा पुस्तक चाळत प्रवास कारण मला खूप आवडत. आणि मी तेच करत होते; हातातलं व. पुं. च पुस्तक चाळत स्वस्थ प्रवास करत होते. तितक्यात दादरला चढलेल्या प्रचंड गर्दीतून एक कॅमेरा आता आला, आला कसला पडलाच तो! त्यामागून चित्र विचित्र आवाज आणि धडपडतच एक २५-२७ वर्षांची सबला नारी आत आली: मध्य रेल्वे, गर्दी आणि दादरच्या डोंबारणीना (तिच्या शब्दात दादरच्या बायका). {म्हणा खरच आहे ते डोंबारी करत नसतील असल्या कसरती करत चढतात संध्याकाळच्या दादरवरून चढणार्या बायका आणि प्रवासही करतात अश्याच कसरती करत}  इंग्रजाळलेल्या मराठीत शिव्या हासडत आणि त्या कॅमेराला सावरत ती एकदाची आत आली. { प्रचंड गर्दीचा फायदा हिला कळलेलाच नाही, तिच्या धारातीर्थी पडणार्या कॅमेराला खाली पडू न देता त्या अपर दयाळू गर्दीने खांद्यावर, मांडीवर झेलल होतं. :D :D ] असो. तिला तिचा कॅमेरा सुस्थितीत मिळाल्यावर मात्र ती जरा शांत झाली. कुर्ला येईपर्यंत आजू-बाजूच्यांशी संवादही साधू लागली. तेव्हा कळल की ती सबला नारी freelancing journalist होती. 

मग माझ कुतूहल जाग झालं आणि बोलता बोलता तिच्या कॅमेरात एका "गोजीरी"शी ओळख झाली. तिच्या कॅमेरात एक विडीओ होता. ज्याची सुरुवात त्या गोजीरीच्या गोंडस आणि लोभस चेहऱ्याने होत होती. मी पटकन म्हटलं किती गोंडस पिल्लू आहे मस्त. खिन्न हसून ती मला म्हणे पूर्ण पहा की, माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे पण तुला म्हणून दाखवते पहा पहा. समजून घेशील तर खूप काही असेल नाही तर माझ्या आयुष्यातलं पाहिलं प्रोजेक्ट आणि तू एक मुलगी म्हणून पहा. त्या सुंदर गोंडस चेहऱ्याच्या मागे आवाज मधाळ बोबडा गोड आवाज. " माझ नाव नकुशा" त्या गोजिर्या चेहऱ्याच नाव नकुशा? माझ्या भुवया उंचावल्या, ती माझ्याकडे अर्थपूर्ण पहात होती. " लेक वाचवा आंदोलन ( save girl child )आणि त्याचे यश" , अमीर खान च्या 'सत्यमेव जयाते'चे पडसात आणि डॉ. चौघुले फरार या सार्यांचे साद-पडसात अश्या अनुशंगाच्या च्या काही प्रौढ आवाजातल्या ओळी आणि पुन्हा तोच लोभस निरागस चेहेरा, पण आता निर्विकार, भावना विरहीत डोळ्यात दडलेली ती बहुप्रश्नांकीत नजर काळजाला हात घालत होती! परत तोच आवाज आणि  पुढे असेच काही चेहेरे निरागस, कोवळे, मग थोडे समंजस, काही तरुण, काही सोशिक, काही गोरे, काही काळे, सगळ्यात साम्य एकाच हरवलेली आणि ना-उमेद नजर! एक छोटा विडीओ संपला. हातात कॅमेरा तसाच पकडून मी फक्त तिच्याकडे पाहिलं ती सांगत होती," आपण कोणालातरी आवडत नाही ही भावना सहन होण्याच्या पलीकडची आणि त्यात ह्या अश्या कितीतरी मुली अजून खेड्यात अश्या नकोश्या असण्याच्या भावनेने  आणि आई-वडिलांवर भार ह्या शब्दांनी दुखावलेल्या अवस्थेत दडपून  जगत आहेत. महाराष्ट्राची लेक म्हणून जन्माला यायची शिक्षा भोगत. त्यात भर म्हणून त्याचं नावच "नकुशा" ठेवण्यात येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा त्या नकोश्या आहेत ही जाणीव त्यांना करून दिली जाते. महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात हे सर्रास चालत पण हा विडीओ आहे नवी-मुंबई मधला: वाशीचा!". ऐकून हैराण झाले मी. 

त्या मागोमाग तिने अजून एक विडीओ दाखवला. त्यात एक जन-जागृती आंदोलनातील स्वयंसेविका पोट-तिडकीने त्या झोपडपट्टीतल्या बायकाना समजावत होती. पहिली बेटी धनाची पेटी : एक मुलगी दोन घर सुशिक्षित करते, सुसंस्कारीत  करते. ' आजची मुलगी उद्याची माता आहे तिच्याशीवाय हे जग पुढे कस जाईल?  तुमचा वंश पुढे कसा जायचा? मुलगा बदलतो लग्नानंतर पण मुलगी नाही, तिच आई वडिलांच सगळ करते.. वैगरे वैगरे" ( तिचे ते सोपे आणि परखड स्पष्ट विचार ऐकून फार बर वाटत होतं )  तेव्हढ्यात एक साठीची आजी उठली, " ये बये बंद कर तुझी बडबड. चांगल-चुंगल नेसून आणि पॉटभर खौंशानी शानपन शिकीवतेस ?? कशाला ग हवीये मुलगी? खायला कहार आन आईशिला भार. नौ नाहीनं पौटात वागवायची आणि बाहीर आल्यावर द्यायची सोडून सर्वांची बोलणी खायला? की बाजारात बसवायला त्याच शंढांची पौट भराला? दिसभर राबा, आधी लेक म्हणून, मग घरवाली म्हणून मग आय म्हणून ऐका. पोरीला जनलीस तर तिथून ऐका मग तिच लगीन त्यापरीस हुंडा जमवा. बोल की." ती स्वयंसेविकाही कसलेली, " आजी तुही एक बाईच आहेस की, हेच सगळ थांबवायचं म्हणून तिला जन्माला घाला. अरे एक वेळ अशी येईल की मुलांना मुलगीच मिळणार नाही. जो पोरगा हवा ना त्याच्याच पाशी संपेल तुमच सगळ. तिला वाढवा मुलगी म्हणून प्रेमाने जवळ करा. तिला ओळख करून द्या ती ताकदवान असल्याची. मुल (son  or  boy) जन्म्लाला घालण्याच म्हशीन नव्हे.
तेव्हड्यात एक तरुण मुलगी नाही बाई उठली जवळ जवळ अंगावर खेसकली, ' कसली गो ताकद कुठूनशान येते गो? अर्ध्यापोटी दारुडा बाप चोपतो तेव्हा की घरवाला रात्र रात्र जागवतो तेव्हा? त्याच्या हाताची एक थप्पड पुरेशी होते त्वोंड गप करायला. तुम्हासनी काय जात सांगाया? लेक हवी म्हण कशाला? फक्त पोर जनायला? की घरावाल्याच्या राती सजवायला की त्याचे रट्टे झेलायला?" जोर-जोरात रडत ती सांगत होती," सत्ताईस वरीस लागल मला आता 3 पोरींची आय हाय मी धा वर्साची मोठी पॉर आता घर्वाल्याच्या डोळ्यात खुपतेय पहा म्हणे, पैका कमवायचं वय हाय तीच! बोल न कशी वाचवू म्या तिला वंगाळ नजरे पासून? इकली न्हाय तर हुंडा कुटून आणू? पैका नाय तर लगीन कोण करल ??  त्यापरीस एक पोरगा असता तर काळजी बी नाय, नी बोलणी बी नाय. माजी कूस भरून पावली असती बघ पोरीच्या काळजीन जीव तुटतो निस्ता."

त्या मागेच एका विडीओ मध्ये एक double  M  A  in psychology  मुलगी सुन्न होऊन पहात होती. रडून रडून आटलेल्या डोळ्यांतून पाण्याच्या अपेक्षेत होती. आणि बोलत होती: तिचा प्रियकर, त्याच्याशी लग्नासाठी सोडलेलं घर, त्याचं उच्चभ्रू वस्तीतल घर, गलेलठ्ठ पगार आणि संकुचित विचारसरणी.. त्याच्या आई-वडिलांच्या नातवाचा अट्टाहास आणि त्याचा  मुलगाच पाहिजे म्हणून असलेला अनाठाई हट्ट.. तिच्या मनाविरुध्ध केलेली गर्भजल परीक्षा आणि जबरदस्तीने गेलेले 3 गर्भपात. मग हट्टाने झगडून मुलीला दिलेला जन्म. बाळाच्या जन्मानंतर सगळ ठीक झाल याचा आनंद आणि तिच्या बाळाच  बारसं :) :) :) ..
आणि विडीओ च्या शेवटी एक गुलाबाच फुल त्या खाली ओळी : हिची एकाच चूक मुलीला जन्म दिला तिच्या अस्तित्वासाठी झगडली आणि तीच नाव ऐकून स्वत:च हरवून गेली. खाली त्या एम ए च नाव कै. _____ .

हा विडीओ संपेपर्यंत ठाणे जवळ आलं होतं, तशी जाता-जाता म्हटली खूप विचलित झालीस न हे पाहून हे वाचून? आहेच हे इतक भयंकर आणि मी उठवणारे आवाज या विरुध्ध. कारण मला न्याय द्यायचाय माझ्या मास्टर्स दीला आणि तिच्या गोंडस गोजिरीला. आणि म्हणून मी इतका खटाटोप करतेय ती "नकुशा" नाहीये ती  "गोजिरी" आहे... ती गोजिरी आहे.. माझ्या दीची "गोजिरी"!

ऐकून माझी गात्र सुन्न झाली ठाणे ते डोंबिवली मी या धक्यातून सावरणे शक्यच नव्हते. यंत्रवत उठले आणि चालत राहिले. घरी आले मनाच्या कप्प्यात ते गोजिर रूप कैद करून टाकल, वाटल विसरले पण छे. आज इतक्या महिन्यां नंतरही  ते पहिल्या विडीओ मधलं लोभस निरागस रुपडं आणि सासरच्यांनी मुलीला ठेवलेलं  "नकुशा" हे नाव ऐकून आणि हरून संपून गेलेली "ती" अबला काही डोक्यातून जात नाहीयेत. मागच्या काही दिवसांपासून वेळेअभावी लिखाण जरी बंद असल तरी "ती" सबला आणि तिच्या कॅमेरात चित्रबद्ध झालेली ती: अबला आणि  "नकुशा" नव्हे "गोजिरी" डोक्यातून काही जात नव्हत्या. अशा नाकुशांसाठीच्या भावना डोळ्यांतून सांडल्या तरी मनातून काही केल्या हलत नव्हत्या म्हणून आज कागदावर उतरवण्याचा हा घाट!   

                                                                                                 ... रेश्मा आपटे 

Tuesday 7 August 2012


माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसाठी खास काहीतरी : ( स्क्राप बुक मधला एक भाग ) 
लग्नाच छोटस गिफ्ट : 1/12/2011.

हातात गुंफलेले सुंदर हात
इवल्या पावलांचे नखरे सात

अ आ इ ई, कागदाची होडी,
कधीच नाही तुटली आमची जोडी

रुसवे फुगवे आणि कट्टी बट्टी
नकळत जमली आपली गट्टी.

रींगा रींगा, गोल्स्पोट, लंगडी, कब्बडी
रडत भांडत खेळत होतो पकडा पकडी

lazy merry , गणिते, अन अल्कली,
नकाशे, सिध्द्धाता आणि सन-सनावळी,

निबंध, कविता, भरताना प्रयोगाची वही
आलीसुद्धा leaving certificate वर शाळेतून सही

पुन्हा कधी? कुठे भेटू?? डोळे पाणावले
पण "जीन्स शॉपी" ने सारे प्रश्नच सोडवले

कोलेज ऑफिस आता "तुझ्या" लग्नाची तयारी
छोटासा प्रयत्न आठवायचा शाळेची वारी...


                                                  ... रेश्मा आपटे 




Thursday 9 February 2012

" वैसी"

 
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just  cut  U  r  self  off  from the matter and  person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life"

तो म्हणत होता ते  सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand  application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं. तरी माझ्या मित्राला, " u  r  right , i shall  keep it in mind always "  आणि तशीच वागेन असे प्रोमीस केले. त्याला प्रोमीस तर केलं आणि खरंच ठरवलं की, परत ही चूक नाही करायची, फक्त केस म्हणून बघायचं आणि involve नाही व्हायचं असं वेड्यासारख... पण!! ट्रेन सुरु झाली आणि परत एकदा ती मुलगी आठवली मला.. Prostitution , immoral  trafficking  in  woman हा प्रश्न हल्ली जास्तीच sensitive होत चाललाय. तो दलाल १०००% गुन्हेगार असतोच पण ती मुलगी??? तिचं काय??? तिला कायदा victim म्हणतो ... हो ती victimच परिस्थितीची... दुसर्याच्या हव्यासाची? पैशाच्या गरजेची? की तिच्या स्वत:च्या मोहाची? की एका पुरुषाच्या क्षणिक मस्तीची? हा प्रश्नच आहे... पण काही असलं तरी ती खरच victim!!!  

आज पण तिची बहिण मला रडून रडून सांगत होती, माझी बहिण फक्त १६ वर्षांची आहे, ती आताच मुंबईत आलीये, madam तिला बाहेर काढा ..ही बहिण .. वय वर्षे २१ च्या आस पास,..  judges म्हणे या cases मध्ये खूप sensitive असतात आणि म्हणून फक्त २१ वर्षांच्या मुलीच्या हातात victim  ची custody  देण शक्यच नाही .. ती मुलगी वाचली कारण पोलिसांनी धाड टाकली, जर नसती टाकली धाड मग?? आरोपीचा हेतू साध्य झाला असता ( विचार करून सुद्धा काटा आला अंगावर) आणि संपूर्ण आयुष्य फुकट गेल असतं. तिच्या बहिणीपेक्षा म्हणे CWC  वाले तिला सुधारू शकतील, तिची काळजी घेऊ शकतील. तिला reformation ची आणि care ची गरज आहे आणि म्हणून तिचा ताबा CWC  ला देण्यात यावा. आम्ही डोक फोडलं पण मुलीचे आई-वडील आल्या शिवाय तिचं घरी जाणं अशक्यच होतं!!!

तिची बहिण सांगत होती, ती फसलीये.. उसे हम गाव भेज देंगे। उसे छुडालो madam ... तिला समजावून आणि आई वडिलांना घेऊन ये सांगून आम्ही बाहेर पडलो. मग माझी शाळा घेतली माझ्या colleague ने पण प्रश्न नाही न सुटत तिथे,,, पुढे काय? कोणत्याही सुधार गृहात अश्या मुलांना ठेवण किती धोक्याच असतं?? खरच सुधारेल ती?? की "संगती संग दोषेण" म्हणून एक चांगला आंबा बाकीच्यांबरोबर राहून नासेल?? पोलिसांना टीप मिळाली म्हणून तिचं आयुष्य वाचल नाहीतर??  काही  दमड्यानसाठी एक मुलगी चक्क बाजारात विकायला काढली होती. नराधमांच्या हपापलेल्या नजरा आणि दलालांचा पैश्याचा हव्यास यात तिचं तारुण्य, तिचं मनं , भावना त्यांनी ओरबाडल्या असत्या. पुरशांच्या राज्यात त्या शेळीच्या पिल्लाचा नाहक बळी गेला असता. मजबुरी च्या नावाखाली स्वतःचा सौदा होताना बघतात मुली.  एकच सत्य म्हणजे शरीर!! तेच विक्रीला काढतात, पण असा भर बाजारात, लिलाव मांडतात त्यांचा.. तेव्हा .. तेव्हा खरच त्यांच्याकडे परीयायच नसतो; मुळात सगळे रस्ते बंद आहेत म्हटल्यावरच अश्या नराधमांच फावत आणि ते चक्क जिती जागती मुलगी विकण्याचा डाव खेळतात. हा, आता असतील काही मुली ह्या सगळ्याकडे easy  money  म्हणून बघत, काही तर फक्त स्वत:च्या आवाजवी इच्छा आणि so  called  गरजा भागवायला पण ह्यात पडत असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्या फक्त काही % च उरलेल्यांच काय??? 

१५ मिनिटे, फक्त १५ मिनिटे मला त्या मुलींशी बोलायला मिळाले तिच्या बरोबरची मुलगी चक्क म्हटली madamji अभी आते आते वो औरत बोली ये लडकीया "वैसी " हैं... सच हैं,  मै.. मै तो हुं ऐसी पर " वैसी" बनना किसीकी ख़ुशी नै होती। जब साला बेवडा बाप किसीको बाजार मै बिठाता हैं ना १४ बरस मै तब सिर्फ दर्द समझता हैं। तब किसीको नाही पता होता की वो "वैसी" बनने जा राही हैं। खरच तिचं दु:ख सारे बंध तोडून वाहत होतं पण डोळे कोरडे ठक्क!! एक उपभोगाची वस्तू म्हणून सतत बघितलं गेल्याची सल आणि समाजाकडून हिणवल, नाकारलं गेल्याची जखम खपली फाडून  बाहेर वाहत होती मनाला पीळ पडेल असे जळजळीत सत्य पण ती मात्र कोरडी उभी होती.
तिच्याकडे बघून वाटल ती, मी, ती समोरची judge सगळ्याच स्त्रिया जनमनाच भावनाप्रधान असलेल्या, मग ही इतकी कोरडी कशी? की जोवर बाई " वैसी" होत नाही तोवरच भाव-भावनांचं आवडंबर माजवते ??? की "वैसी" झाल्यावर गमवायला काहीच उरत नाही म्हणून भावनाच मरतात???  शेवटी तीही जिवंत माणूस आहे, स्त्री आहे तिलाही तिचं भाव-विश्व आहेच की!!  हे मला कधीच का नाही उमगल?? ती "वैसी" म्हणून हिणवायचे तरी, नाहीतर सहानुभूती (तीही किलो किलोने ) दाखवत फिरायचे (तेही समाजसेवेचा फार्स म्हणून).. का नाही त्यांना माणूस म्हणून समाजून घेत कोणी??? लहानपणापासून कोरलेले संस्कार.. परिस्थितीला शरण नाही जायचं. चारित्र्य जपायचे.. वैगरे जे पांढरपेशी तत्वज्ञान असते, ते भरल्या पोटी ऐकायला ठीक असते. पण खरंच जेव्हा जन्मदाताचं एखादीला.. त्याच भाषेत सांगायचे तर धंद्याला बसवतो तेव्हा?? जेव्हा त्या अर्धपड्या वयात पोटातली भूक बोलू लागते तेव्हा?? स्वत:चा सौदा मांडला जातो तेव्हा, कसं वाटत असेल त्या मुलीला??? आपण कधीच हा विचार करत नाही. अशी "वैसी" बनलेली स्त्री आणि तिचं अस्तित्व तिच्या समस्या कोण मनापासून समजून घेतं का?? मी तरी कधीच नाही विचार केला आजवर. पण आज करावासा वाटतोय खरंच जे आहे ते हे असे, ती अशी आहे, मग?? what  next ?? पुढे?? तिला सहानुभूती द्यायची फक्त आणि credit  घ्यायचं जसे बरेचदा घडते की तिला संधी द्यायची ?? तिचं ऐकायचे, समजून घ्यायचं नी सहानुभूती न देता तिला हिम्मत द्यायची?? पुनश्च सुरुवात करायला प्रवृत्त करायचं??? 

जिला हात हवा, तिला हात देऊन त्या दलदलीतून बाहेर काढून, मोकळा श्वास घ्यायला मदत करायची! असा 
निश्चय झाला. त्या कळीला उमलण्या आधीच, असे कोमेजून नाही द्यायचे. पण हे खरच जमेल मला? ठरलं... बाकीच्यांचं माहीत नाही पण जी हातात आहे, तिच्यासाठी काहीतरी करायचेच, मनात गाठ मारली. हा विषय आणि समस्या खूप क्लिष्ट आहेत, नाजूक आहे हा विषय!! पण विचार करायलाच हवा निदान तिच्या साठीतरी!! प्रचंड राग आणि ता मुलीसाठी काहीही न करू शकल्यामुळे आलेली अस्वस्थता सावरून, आवरून घेऊन आणि विचार "नाही" करायचा अजून असे ठरवून मी ट्रेन मधून उतरले. घरी आले तो माझ्या बेडरूम मधलं चिऊच घरटं!! आज रिकाम वाटलं, म्हणून जरा डोकावून बघते तो काय?? पिल्लं उडून घरटा ओस पडलेला. माझ्यासाठी नेहमीच अप्रूप असलेलं आणि गवत, कापूस, चार काटक्यांनी सजवून सुध्धा सजीव भासणार ते घरटं भकास, उजाड दिसत होतं. ते घरटं पाहून आज खूपच अस्वस्थ वाटलं मला!!! सहज मनात आलं, त्या मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा??? तिच्या आईच ते निगुतीन मांडलेल चार भिंतीत वसलेलं 'घरटं' ते पण असच क्षणात भकास आणि उजाड  होऊन जाईल न???? ...


                                                                                        ... रेश्मा आपटे 

Sunday 1 January 2012

अलविदा २०११ - welcome 2012

अलविदा २०११ आणि welcome  २०१२ :)

दर वर्षीप्रमाणे यंदाही आलाच ३१ डिसेंबर .. वाजत गाजत स्वागत केलेले आणिक एक वर्ष सरले नकळत भूतकाळात जमा झाले आणि उद्या उद्या म्हणता म्हणता २०१२ वर्तमान झाले ...

खरच किती किती काय काय घडल २०११ मध्ये : ओसामा च्या वधापासून,  जपान मधली Tsunami , tim killed in libya, वगैरे राष्ट्रीय पातळ्यांवर  अशी अनेक वादळे जेव्हा धडक  देत होती भारतातही खूप काही सुरु होते : लोकपाल विधेय्यक, अण्णा हजारेंच जनव्यापी आंदोलन, आण्णा आणि टीम च्या उपोषणाच्या बदल्यात त्याना मिळालेली फक्त आश्वासने, सरकारचे नाकरते पण आणि खिसेभरू धोरण, कसाबच्या फाशीच्या शिक्षेला हाय कोर्टकडून मिळालेले confirmation, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच chewing gumसारखे चघळून चोथा झालेले गरीबी, महागाई हे प्रश्न होतेच जोडीला. एक ना अनेक घडामोडी जश्या वाईट तश्या चांगल्याही आशिया खंडात world cup चे आयोजन आणि तब्बल २७-२८ वर्षानंतर भारताने मिळवलेले जगज्जेतेपद , एक  मागे राहिलेली रुख रुख ती म्हणजे सचिनच्या शतकांची सेन्चुरी .. त्यासाठी आता २०१२ चाच मुहूर्त लागणार बहुदा,..
खूप घडामोडी, अविरत घडणारे बदल प्रचंड स्पीड ने जगणारी माणसे आणि तितकीच एक-मेकांपासून दूर जाणारी मनं !!!किती काय काय घडलाय? किती घडतंय आणि किती संकट समोर उभी आहेत..  असे असूनदेखील गत वर्षाला हासत bye  करणारे हात येत्या २०१२ ला कवेत घेण्यास सज्ज आहेतच, त्याच उत्सहात आणि आनंदात !!!


सरत्या वर्षाबरोबर अनेक कडू-गोड क्षणाच्या आठवणी झाल्या आणि आज वेळ आलीये ती नवीन संकल्पांची ,.. काल आजीची खोली तिच्याबरोबर आवरताना २ गाठोडी मिळाली त्यांनी या सत्याची अजूनच जाणीव करून दिली की उद्या कधीच उजाडत नाही कारण तो उजाडला की त्याचा आज झालेला असतो. पण "आज" चा कधी ना कधी "काल" होतोच आणि म्हणूनच जोवर "आज" आहे तोवर काम करायचे, आठवणी तयार करायच्या आणि  जेव्हा त्याच :आज" चा काल होईल तेव्हा त्या गुंफलेल्या आठवणी जपायच्या, शिकायचं त्यातून आणि पुनश्च सुरुवात करायची :) :) या वर्षी असाच काही आठवणी मी ब्लोग वर टाकणारे " गाठोड्यातल्या आठवणी " या सदराखाली ,,, आजी म्हणते ते पोचवायला किती जमेल ते माहित नाही पण प्रयत्न १०० % असेल :) नवीन वर्षाचा संकल्प म्हणू हव तर :) :)

एकुणात काय तर.. २०११ आणि २०१२ च्या उंबर्यावर असताना आज खरच वाटतंय आणिक एक वर्ष सरल खूप काही शिकवून गेल, देऊन गेल आणि एक नवीन वर्ष येतंय नवी आशा नवा उत्साह घेऊन ...
                                                                                   
                                                                                           . . . रेश्मा आपटे