Thursday 28 June 2018

ठाणेकर ती

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते डोंबिवली हा स्लो लोकल ने दिड तासाचा प्रवास. त्यात उन्हाचा जोर. गरम हवेने वैताग आला होता. काही जणी पेंगत होत्या स्वतःच डोकं धडावर न सावरता मुक्तपणे बाजूचीचा खांदा स्टॅन्ड म्हणून वापरला जात होता. काही जणी कानात बूच घालून पिक्चर बघण्यात, गाणी ऐकण्यात मग्न होत्या. माझ्या फोन ची बॅटरी मारायला टेकली असल्याने आणि मला झोप येत नाही म्हणून मी टक्क जागी होते (ज्याचा खरंतर मला राग येत होता) दादर आलं आणि एक मुलगी ट्रेन मध्ये चढली.माझ्या बाजूच्या सीटवर जागा मिळवत प्रसन्न हसली! इतक्या अस्वस्थ आणि कंटाळवाण्या वातावरणात ती इतकी प्रसन्न हसली म्हणून मला वाटलं कोणी ओळखीची असेल. मनात बऱ्याच जुळणाऱ्या चेहऱ्यांची उजळणी आपसूक सुरु झाली पण ओळख काही पटेना. तेव्हढ्यात तिने पाणी मागितलं. मी सहज बाटली पुढे केली. ती परत करताना म्हणाली किती उकडतंय नाही आज. मी ओठ फाकवत हसल्यासारखं काहीतरी केलं. डोक्याला भुंगा लागला होता,कोण असेल ही मुलगी? कुठे चढलीस? एकेरीवर अली म्हणजे नक्की ओळखते. 
मी: सी एस टी. 

ती:मी दादरला चढले. ऊन मस्त पडलंय यंदा म्हणजे आंबा छान मिळेल असं वाटतंय. 

मी न राहून विचारलं, चेहरा ओळखीचा वाटतोय पण नेमकं कुठे भेटलेलो आपण ते काही आठवत नाहीये. 

ती: छे छे मलाही नाही आठवते म्हणजे आपली ओळख आत्ता दादरला मी चढले तेव्हांचीच की!

मी बरं म्हणत संभाषण तोडलं. राग आला मला डोक्याला ताण दिल्याचा आणि त्या वैतागवाण्या बाईवर वेळ घालवल्याचा. 
ती: मला सांग ओळख कशाला लागते? आपण ट्रेन मधून जातो ४ चांगले शब्द बोललो एकमेकांशी की छान जातो दिवस. मी पूर्ण दुर्लक्ष करण्याचं धोरण अवलंबल. डोळे मिटून झोपेचं सोंग, हमखास कटकट सोडवणारी युक्ती. पण घाटकोपर गेलं आणि ट्रेन काही हलेना. डोळे उघडले आणि बाजुचीने  मौके पे चौका मारला. ती परत सुरु झाली. मरणाच्या उकड्यात नी घामात हिला विषय कसे सुचतात याचच मला नवल वाटत होत.समोर उभ्या असलेल्या काकूंची दया येऊन मी त्यांना माझं आसन दिल नी एका पायावर शरीराचा भार सांभाळत उभी राहिले. तर ही बाया परत बोलायला लागली,"कुठे उतरणार?" मी म्हटलं डोंबिवली. मला म्हणे नवल आहे डोंबिवलीच्या बायका सीट देत नाहीत असं ऐकलेलं म्हणून म्हटलं तू नसशील डोंबिवलीची. खूप शब्द अचानक डिवचलं गेल्यासारखे बाहेर येऊ पाहत होते पण त्यामुळे तिला आणखी विषय मिळेल असा विचार करून मी ते शिताफीने मागे फिरवले. तितक्यात दिलेल्या सीट ची किम्मत राखत त्या काकू बोलल्या तू नाही ना डोंबिवलीची तरी नाही दिलीस ना सीट आता गप बस. 

माझ्या मनात विचार आला याना डोंबिवली पर्यंत सीट देऊन टाकू पण तोही मी शिताफीने मागे हाकलला आणि दुर्लक्ष मोहीम सुरु केली. माझे पेशन्स लोकल ट्रेन ने खूपच वाढवलेत हे मात्र खरं. पण थांबेल तर ती बाया कसली? 
ती : नाही मी डोंबिवलीची नाही ठाण्याची आहे. मध्यवर्ती ठाणे. लग्नांनंतर ठाणेकर. (विचारलं का तुला?)मी आपलं सहज म्हणून म्हटलं हो दुखवायचा हेतू नव्हता माझा कोणाला. आपलं बोलायला विषय काहीतरी नाहीतर हा ट्रेन प्रवास असह्य होतो. माझ्या चेहऱ्यावरचं स्पष्ट दिसणारं इरिटेशन पाहून ती परत हसून बोलायला लागली, अग चिडतेस काय? खरंच हेतू नाही ग कोणाला त्रास द्यायचा. पण पहा म्हणजे पटलं तर! (अजून ही बया बोलतेचं आहे, एक थोत्रित ठेऊन द्यावीशी वाटली तिच्या. पण ते शक्य नव्हतं ना मग प्रचंड राग आला की १० ते १ असे आकडे मोजायचे मनात असं आजोबांनी सांगितलेलं आठवलं. पण तिची न थांबणारी बडबड १००० पासून उलटे अंक मोजले तरी माझा राग आता अनावर करेल अशी चिन्ह दिसली.) इतके हिंस्त्रक विचार मनात चालू असताना हीच आपलं सुरूच.. 

तर पटतंय का बघा, म्हणजे ट्रेन आपल्या गतीने जाणार. ही गरमी, गर्दी यात आपण काहीच बदलू शकत नाही. त्यात आजूबाजूच्यांचे वैतागवाणी उसासे, कवलेले चेहेरे आपला त्रास आणि ताप वाढवणार, वैतागत प्रवास संपवणार आपण आणि तीच वैताग, चिडचिड अश्या भावनांची लागण आपण घरी जाऊन करणार. मग सासू, मुलं कोणीच नाही तर हक्काचा नवरा यांवर चिडणारं मग चिडचिड करून त्रासात झोपणार आणि एक वाईट दिवस संपला असा उसासा सोडत झोपणार तेही अशांत झोपेमुळे दुसऱ्या खराब दिवसाची सुरुवात करण्यासाठी." ..( अजब, होतं खरं असच! जणू फास्ट फॉर्वड मध्ये तिने तो दिवस दाखवला मला. आपसूक मी ऐकायला लागले..) " तर बिघडलं कश्यामुळे? ट्रेन? ऊन? गर्दी? माझी बडबड? की फक्त आपला दृष्टिकोन? पॉसिटीव्ह विचारांची लागणं पटकन होत नाही पण एक वैतागवाणा उसासा सगळ्यांना वैताग देतो. म्हणजे ती काही आपली चूक नाही पण निगेटिव्ह इमोशनचं कौतुक जरा जास्तीच होतं. असो. तर मुद्दा असा की, आपला पुढचा दिवस कसा जाणार हे या क्षणावर ठरत. मग वैतागण्यापेक्षा आपण शांत राहू परिस्थितीशी सुसंगत होऊन आपली मनं शांत ठेऊ. म्हणजे मग माझी बडबड, या ट्रेन चा ओंगळवाणा प्रवास सुसह्य होईल आणि कदाचित आपण हसत घरात जाऊ, त्यानंतर शांतपणे घराची कामं करू, कोणाचाही रागच नाही येणार कारण मन आनंदी असेल. एखादं छान गाणं लावू, नवऱ्याला चांगला वेळ देऊ आणि एक सुंदर दिवस रात्रीत बदलेलं" सगळं कस डोळ्यासमोर साकार झाले. 

कल्पनेनेच खूप उत्साह आला. आणि तेव्हढ्यात ट्रेन सुरु झाली. आम्ही तिघींनी हसून एकमेकींकडे पाहिलं आणि बाकीच्यांचे उसासे ऐकून अजून हसू आलं. वाह एका सुंदर संध्याकाळची सुरुवात मध्यवर्ती ठाणेकरणीने करून दिली होती. 

अचानक सगळं सुसह्य वाटायला लागलं. घरी गेल्यावर करायच्या कामांची डोक्यात गर्दी न होता चेक लिस्ट बनली आणि ट्रेन एकदाही न थांबता डोंबिवलीत पोहोचली.