Friday 23 November 2012

पाऊस

आज खूप दिवसांनी मी एकटी निवांत घरी होते. दिवेलागणीला देवासमोर समई  लावली आणि खिडकीतून डोकावले तर गार वार्याची एक झुळूक अंगाला अलगद स्पर्शून गेली. मावळतीच्या छटांनी आकाश सजल होत. त्यातच काही काळे ढग अवकाशात मुक्त संचार करत होते. वार्याचा वेग वाढला तशी झाडेही डोलू लागली. काही पिकली पाने उतरवून स्वत:चा भर हलका करू लागली. मावळतीच्या देखाव्याने सजलेल आभाळ अचानक रूपड पालटू लागल. काळी चादर पांघरलेल्या आभाळातून एक लख्ख वीज आभाळ कापत गेली, आणि पाठोपाठ चार-दोन थेंब धरणीवर सांडले आणि लुप्त झाले. त्याना पाहायला की काय कोण जाणे मागोमाग असंख्य थेंब ढगांतून मुक्त झाले. लहान मुलीसारखी मी खिडकी बाहेर हात काढून ते थेंब झेलायचा प्रयत्न करत होते.

माझा तो पोरखेळ मला थेट शाळेत घेऊन गेला. भिजायला मिळव म्हणून मुद्दाम छत्री विसरणारी मी, मग शाळेतून घरी आल्यावर आईचा ओरडा खायचा तोही पाऊस बघत. मग हळू हळू मोठी होत गेले, तशी पाऊस खूप काही शिकवत गेला. आईचा डोळा चुकवून पावसात ओरडत नाचत फिरणार्या मला कॉलेज मध्ये गेल्यावर त्या थेंबांशी गुज-गोष्टी कारण अधिकच आवडू लागल. मग हळू हळू ते थेंब अनुभवण आणि पडणाऱ्या पावसाचा तो आवाज मनात साठवण अस एक आगळच खूळ लागल. या पावसाने मग कधी खूप खूप स्वप्न दाखवली, त्या स्वप्नात मला झुलवल. काही चेहेरे त्यांच्या सहवासातले पावसातळे  सुंदर क्षण आज मला खूप प्रकर्षाने आठवत राहिले. काही विसरली वाटणारी माणस कशी काल-परवाच हातात-हात गुंफून चालत असल्यासारखी खरी खरी वाटायला लागली. ते चेहेरे, पावसात चिंब करणाऱ्या त्या आठवणी, मोहरणारे क्षण, आणि अचानक आठवली.. ती स्वप्न अशाच पावसात विस्कटलेली. आणि मग पावसानेच मदतीला येऊन डोळ्यातल्या पाण्यात मिसळून टाकलेले थेंब,, सार काही डोळ्यासमोर येत राहील. पाऊस बाहेर कोसळतच होता. मी ते पाणी पाहत होते. सतत कोसळणाऱ्या धारातून एक बाईक भरधाव जाताना दिसली आणि एक भिजरी संध्याकाळ हलकेच मनावर तरंगली, पुन्हा एकदा पावसाने मला हसवलं. तेव्हा सुंदर सुंदर वाटणारा पाऊस आजही रिमझिम करत मला गुदगुल्या करत होता. वाकुल्या दाखवत माझ्याबरोबर हसत होता.

ते आठवणींच चलचित्र पाहताना, वाटल मी स्वत:ला नव्याने ओळखतेय. काही आठवणींवर हसतेय तर काहीं आठवणींकडे एक समजूतदार नजर टाकून पुढे सरतेय. हे सगळ सुरु असताना माझा जुना पोरखेळ सुरुच होता. त्या टपोऱ्या थेंबाना ओंजळीत साठवायचा खेळ!!  पण ते टपोरे थेंब हातावर विसावले की कितीही हवे-हवेसे वाटले तरी ते हातून निसटून जात होते, भरली भरली वाटणारी ओंजळ हलकेच रीती करून जात होते. पण अचानक जाणवलं की ते ओंजळीतून निसटतानाही तळव्यांवर एक सुखद ओलावा ठेवून जातायत. त्या अनुभवाची अनुभूती आणि आठवणींची हवी-हवीशी वाटणारी खून हळुवार मागे ठेऊन जातायत. सरींतून कोसळणार ते पाणी माझ्या थेट मनापर्यंत पोहोचून मला तृप्त.. तृप्त करून गेल. पाऊस आज पुन्हा नव्याने शिकवून गेला.

हसवणारा, कधी रडवणारा, तर कधी रडवल्यावर कवेत घेणारा पाऊस... त्याच न माझ नातच वेगळ आहे. पाऊस म्हणजे पाणी...  मला भुरळ घालणारी एकमेव गोष्ट : पाणी! नदीच असो वा समुद्राचं, झऱ्यातून  खळाळणार, धबधब्यातून कोसळणार, किंवा अगदी नळातून वाहणार असो मला पाणी नेहमीच भुरळ घालत आणि सगळ्यात भावणार पाणी म्हणजे पावसाच्या स्वरूपात येऊन चिंब चिंब करणार. मला पाणी भावत कारण त्याला गती असते. ते कधी थांबत नाही चांगल वाईट सगळ आपल्यात सामावून घेत. पाऊस, पाणी वाहत असत अविरत आणि शिकवत असत जगण्याची प्रक्रीया. जे हव ते घेऊन आणि नको ते नेमक काठाला ठेऊन सतत गतिमान राहायचं. हातून निसटलेल्या क्षणांना आठवणीत जपायचं आणि त्या अनुभवातून शिकत राहायचं.!!!

                                                                                           ... रेश्मा आपटे