Thursday 30 August 2012

काही बोललो ..बरच काही बोललो नाही ..
काही शब्द सापडले . काही शोधतच बसलो ..
विचारांत फक्त घोळत बसलो ..झाले इतकेच की  ..
मी आज पुन्हा तुझ्याशी बोललो..


ओलाव्याची ती वाक्ये तर काही सापडली नाही ..
ठेवलेली टोपण नावे येहूनही आली नाही..
काही शब्द आठवून स्वतः शीच हसलो ..झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

शब्द काही आपलेसे वाटले, अर्थ मात्र अनोळखी भासले
तीच तू, तोच आवाज, बोलणे मात्र परके वाटले
पुरा.. पुरा मी आठवणीत हरवलो ... झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

न बोलता सगळ ओळखणारी तू ..
आज मात्र 'आणि, अजून ,बोल ' म्हणत राहिलीस ...
थांबलेले शब्द..,अन वाढलेली अंतरे दाखवत होतीस..
न कळे , मी मात्र नवीन नात्याला नव नाव शोधात बसलो ..

झाले इतकेच की , मी आज तुझ्याशी बोललो


बोलायचे खूप होते, अनेक जाब विचारायचे होते
शब्द सगळे अडकत होते, अर्थ डोक्यात शिरत नव्हते
नकळत ती अंतरे सांधायला धावलो .. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


अस्फुट हास्य, बटांशी खेळणं, तुझं निरागस लाजण,
ती भांडण, ते रुसणं, चाफेकळी बरोबर तुझं खुलण
सार आठवून तृप्त हसलो.. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


चाफा आजही बहरलाय, सुवास माझ्यात भरून रहीलाय
पण आजचा क्षण आपला म्हणून उमलत नाहीये
हा क्षण स्वप्नात उमलवत राहिलो ... झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


                                          ... रेश्मा आपटे आणि वैभव भानूशाली 

Friday 17 August 2012

नकुशा


पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे मला पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. अशीच एक पत्रकार मुंबईच्या मध्य रेल्वे मध्ये हल्लीतच भेटली. खरतर संध्याकाळच्या वेळी शांतपणे झोपून किंवा फारतर गाणी ऐकत किंवा पुस्तक चाळत प्रवास कारण मला खूप आवडत. आणि मी तेच करत होते; हातातलं व. पुं. च पुस्तक चाळत स्वस्थ प्रवास करत होते. तितक्यात दादरला चढलेल्या प्रचंड गर्दीतून एक कॅमेरा आता आला, आला कसला पडलाच तो! त्यामागून चित्र विचित्र आवाज आणि धडपडतच एक २५-२७ वर्षांची सबला नारी आत आली: मध्य रेल्वे, गर्दी आणि दादरच्या डोंबारणीना (तिच्या शब्दात दादरच्या बायका). {म्हणा खरच आहे ते डोंबारी करत नसतील असल्या कसरती करत चढतात संध्याकाळच्या दादरवरून चढणार्या बायका आणि प्रवासही करतात अश्याच कसरती करत}  इंग्रजाळलेल्या मराठीत शिव्या हासडत आणि त्या कॅमेराला सावरत ती एकदाची आत आली. { प्रचंड गर्दीचा फायदा हिला कळलेलाच नाही, तिच्या धारातीर्थी पडणार्या कॅमेराला खाली पडू न देता त्या अपर दयाळू गर्दीने खांद्यावर, मांडीवर झेलल होतं. :D :D ] असो. तिला तिचा कॅमेरा सुस्थितीत मिळाल्यावर मात्र ती जरा शांत झाली. कुर्ला येईपर्यंत आजू-बाजूच्यांशी संवादही साधू लागली. तेव्हा कळल की ती सबला नारी freelancing journalist होती. 

मग माझ कुतूहल जाग झालं आणि बोलता बोलता तिच्या कॅमेरात एका "गोजीरी"शी ओळख झाली. तिच्या कॅमेरात एक विडीओ होता. ज्याची सुरुवात त्या गोजीरीच्या गोंडस आणि लोभस चेहऱ्याने होत होती. मी पटकन म्हटलं किती गोंडस पिल्लू आहे मस्त. खिन्न हसून ती मला म्हणे पूर्ण पहा की, माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे पण तुला म्हणून दाखवते पहा पहा. समजून घेशील तर खूप काही असेल नाही तर माझ्या आयुष्यातलं पाहिलं प्रोजेक्ट आणि तू एक मुलगी म्हणून पहा. त्या सुंदर गोंडस चेहऱ्याच्या मागे आवाज मधाळ बोबडा गोड आवाज. " माझ नाव नकुशा" त्या गोजिर्या चेहऱ्याच नाव नकुशा? माझ्या भुवया उंचावल्या, ती माझ्याकडे अर्थपूर्ण पहात होती. " लेक वाचवा आंदोलन ( save girl child )आणि त्याचे यश" , अमीर खान च्या 'सत्यमेव जयाते'चे पडसात आणि डॉ. चौघुले फरार या सार्यांचे साद-पडसात अश्या अनुशंगाच्या च्या काही प्रौढ आवाजातल्या ओळी आणि पुन्हा तोच लोभस निरागस चेहेरा, पण आता निर्विकार, भावना विरहीत डोळ्यात दडलेली ती बहुप्रश्नांकीत नजर काळजाला हात घालत होती! परत तोच आवाज आणि  पुढे असेच काही चेहेरे निरागस, कोवळे, मग थोडे समंजस, काही तरुण, काही सोशिक, काही गोरे, काही काळे, सगळ्यात साम्य एकाच हरवलेली आणि ना-उमेद नजर! एक छोटा विडीओ संपला. हातात कॅमेरा तसाच पकडून मी फक्त तिच्याकडे पाहिलं ती सांगत होती," आपण कोणालातरी आवडत नाही ही भावना सहन होण्याच्या पलीकडची आणि त्यात ह्या अश्या कितीतरी मुली अजून खेड्यात अश्या नकोश्या असण्याच्या भावनेने  आणि आई-वडिलांवर भार ह्या शब्दांनी दुखावलेल्या अवस्थेत दडपून  जगत आहेत. महाराष्ट्राची लेक म्हणून जन्माला यायची शिक्षा भोगत. त्यात भर म्हणून त्याचं नावच "नकुशा" ठेवण्यात येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा त्या नकोश्या आहेत ही जाणीव त्यांना करून दिली जाते. महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात हे सर्रास चालत पण हा विडीओ आहे नवी-मुंबई मधला: वाशीचा!". ऐकून हैराण झाले मी. 

त्या मागोमाग तिने अजून एक विडीओ दाखवला. त्यात एक जन-जागृती आंदोलनातील स्वयंसेविका पोट-तिडकीने त्या झोपडपट्टीतल्या बायकाना समजावत होती. पहिली बेटी धनाची पेटी : एक मुलगी दोन घर सुशिक्षित करते, सुसंस्कारीत  करते. ' आजची मुलगी उद्याची माता आहे तिच्याशीवाय हे जग पुढे कस जाईल?  तुमचा वंश पुढे कसा जायचा? मुलगा बदलतो लग्नानंतर पण मुलगी नाही, तिच आई वडिलांच सगळ करते.. वैगरे वैगरे" ( तिचे ते सोपे आणि परखड स्पष्ट विचार ऐकून फार बर वाटत होतं )  तेव्हढ्यात एक साठीची आजी उठली, " ये बये बंद कर तुझी बडबड. चांगल-चुंगल नेसून आणि पॉटभर खौंशानी शानपन शिकीवतेस ?? कशाला ग हवीये मुलगी? खायला कहार आन आईशिला भार. नौ नाहीनं पौटात वागवायची आणि बाहीर आल्यावर द्यायची सोडून सर्वांची बोलणी खायला? की बाजारात बसवायला त्याच शंढांची पौट भराला? दिसभर राबा, आधी लेक म्हणून, मग घरवाली म्हणून मग आय म्हणून ऐका. पोरीला जनलीस तर तिथून ऐका मग तिच लगीन त्यापरीस हुंडा जमवा. बोल की." ती स्वयंसेविकाही कसलेली, " आजी तुही एक बाईच आहेस की, हेच सगळ थांबवायचं म्हणून तिला जन्माला घाला. अरे एक वेळ अशी येईल की मुलांना मुलगीच मिळणार नाही. जो पोरगा हवा ना त्याच्याच पाशी संपेल तुमच सगळ. तिला वाढवा मुलगी म्हणून प्रेमाने जवळ करा. तिला ओळख करून द्या ती ताकदवान असल्याची. मुल (son  or  boy) जन्म्लाला घालण्याच म्हशीन नव्हे.
तेव्हड्यात एक तरुण मुलगी नाही बाई उठली जवळ जवळ अंगावर खेसकली, ' कसली गो ताकद कुठूनशान येते गो? अर्ध्यापोटी दारुडा बाप चोपतो तेव्हा की घरवाला रात्र रात्र जागवतो तेव्हा? त्याच्या हाताची एक थप्पड पुरेशी होते त्वोंड गप करायला. तुम्हासनी काय जात सांगाया? लेक हवी म्हण कशाला? फक्त पोर जनायला? की घरावाल्याच्या राती सजवायला की त्याचे रट्टे झेलायला?" जोर-जोरात रडत ती सांगत होती," सत्ताईस वरीस लागल मला आता 3 पोरींची आय हाय मी धा वर्साची मोठी पॉर आता घर्वाल्याच्या डोळ्यात खुपतेय पहा म्हणे, पैका कमवायचं वय हाय तीच! बोल न कशी वाचवू म्या तिला वंगाळ नजरे पासून? इकली न्हाय तर हुंडा कुटून आणू? पैका नाय तर लगीन कोण करल ??  त्यापरीस एक पोरगा असता तर काळजी बी नाय, नी बोलणी बी नाय. माजी कूस भरून पावली असती बघ पोरीच्या काळजीन जीव तुटतो निस्ता."

त्या मागेच एका विडीओ मध्ये एक double  M  A  in psychology  मुलगी सुन्न होऊन पहात होती. रडून रडून आटलेल्या डोळ्यांतून पाण्याच्या अपेक्षेत होती. आणि बोलत होती: तिचा प्रियकर, त्याच्याशी लग्नासाठी सोडलेलं घर, त्याचं उच्चभ्रू वस्तीतल घर, गलेलठ्ठ पगार आणि संकुचित विचारसरणी.. त्याच्या आई-वडिलांच्या नातवाचा अट्टाहास आणि त्याचा  मुलगाच पाहिजे म्हणून असलेला अनाठाई हट्ट.. तिच्या मनाविरुध्ध केलेली गर्भजल परीक्षा आणि जबरदस्तीने गेलेले 3 गर्भपात. मग हट्टाने झगडून मुलीला दिलेला जन्म. बाळाच्या जन्मानंतर सगळ ठीक झाल याचा आनंद आणि तिच्या बाळाच  बारसं :) :) :) ..
आणि विडीओ च्या शेवटी एक गुलाबाच फुल त्या खाली ओळी : हिची एकाच चूक मुलीला जन्म दिला तिच्या अस्तित्वासाठी झगडली आणि तीच नाव ऐकून स्वत:च हरवून गेली. खाली त्या एम ए च नाव कै. _____ .

हा विडीओ संपेपर्यंत ठाणे जवळ आलं होतं, तशी जाता-जाता म्हटली खूप विचलित झालीस न हे पाहून हे वाचून? आहेच हे इतक भयंकर आणि मी उठवणारे आवाज या विरुध्ध. कारण मला न्याय द्यायचाय माझ्या मास्टर्स दीला आणि तिच्या गोंडस गोजिरीला. आणि म्हणून मी इतका खटाटोप करतेय ती "नकुशा" नाहीये ती  "गोजिरी" आहे... ती गोजिरी आहे.. माझ्या दीची "गोजिरी"!

ऐकून माझी गात्र सुन्न झाली ठाणे ते डोंबिवली मी या धक्यातून सावरणे शक्यच नव्हते. यंत्रवत उठले आणि चालत राहिले. घरी आले मनाच्या कप्प्यात ते गोजिर रूप कैद करून टाकल, वाटल विसरले पण छे. आज इतक्या महिन्यां नंतरही  ते पहिल्या विडीओ मधलं लोभस निरागस रुपडं आणि सासरच्यांनी मुलीला ठेवलेलं  "नकुशा" हे नाव ऐकून आणि हरून संपून गेलेली "ती" अबला काही डोक्यातून जात नाहीयेत. मागच्या काही दिवसांपासून वेळेअभावी लिखाण जरी बंद असल तरी "ती" सबला आणि तिच्या कॅमेरात चित्रबद्ध झालेली ती: अबला आणि  "नकुशा" नव्हे "गोजिरी" डोक्यातून काही जात नव्हत्या. अशा नाकुशांसाठीच्या भावना डोळ्यांतून सांडल्या तरी मनातून काही केल्या हलत नव्हत्या म्हणून आज कागदावर उतरवण्याचा हा घाट!   

                                                                                                 ... रेश्मा आपटे 

Tuesday 7 August 2012


माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसाठी खास काहीतरी : ( स्क्राप बुक मधला एक भाग ) 
लग्नाच छोटस गिफ्ट : 1/12/2011.

हातात गुंफलेले सुंदर हात
इवल्या पावलांचे नखरे सात

अ आ इ ई, कागदाची होडी,
कधीच नाही तुटली आमची जोडी

रुसवे फुगवे आणि कट्टी बट्टी
नकळत जमली आपली गट्टी.

रींगा रींगा, गोल्स्पोट, लंगडी, कब्बडी
रडत भांडत खेळत होतो पकडा पकडी

lazy merry , गणिते, अन अल्कली,
नकाशे, सिध्द्धाता आणि सन-सनावळी,

निबंध, कविता, भरताना प्रयोगाची वही
आलीसुद्धा leaving certificate वर शाळेतून सही

पुन्हा कधी? कुठे भेटू?? डोळे पाणावले
पण "जीन्स शॉपी" ने सारे प्रश्नच सोडवले

कोलेज ऑफिस आता "तुझ्या" लग्नाची तयारी
छोटासा प्रयत्न आठवायचा शाळेची वारी...


                                                  ... रेश्मा आपटे