Sunday 2 June 2013

प्रेम

तस 'त्या' च 'ती' च नात फार जुनं!!

वर्षभर तिनं वाट पहावी, त्यान तिला झुरत ठेवावं, ती खूप तापली की, त्यान हळूच याव. काही क्षणांचाच सहवास पण तिनं लगेच तृप्त हसावं. तिचा पहीला राग ओसरला की, त्यानं पुन्हा गायब व्हावं. आलाय..  आता येईलच म्हणत तिनं पुन्हा प्रतीक्षेत झुरावं. तिनं खूप खूप निराश, नाराज व्हाव आणि मग त्याने पूर्णत: तिच्याकडे याव. त्याचा हा खेळ अगदी ठरलेला. तिला त्रास देण हा त्याचा छंदच जणू!

तो परत येतो..  तिला खुलवण्यासाठी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. पण ती काही बधत नाही . मग तोही हट्टाला पेटतो तोही मागे हाटत नाही. मग सुरु होते जुगलबंदी!!! 

तिचा राग त्याचा हट्ट, तिची तडफड त्याची तगमग, तिचे नखरे त्याच्या कला, तिची नजाकत त्याची कल्पकता, त्याने कधी हळूच याव तर कधी चिडून बरसाव, सगळे खेळ, सगळे उपाय त्याने करून पाहावे..   तिनं मात्र अबोला जपावा!  मग त्याचा धीर सुटतो. खचून त्याने तिला प्रेमाने कवटाळावे आणि तिने राग सोडून हळूच हसावे, त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा आणि  'त्या' च्या प्रेमात 'ती' ने भिजत रहावे. मग त्याने तिला आवेगाने जवळ करावे. त्या आवेगात ती गुदमरते आणि शेवटी त्याच्या आधीन होते. ती पूर्णपणे त्याची होते आणि तो तिला पूर्णत्व बहाल करतो. खुशीत येवून मग 'तो' गर्जत, गडगडत बरसून आपले प्रेम जगजाहीर करतो, 'ती'ही मग लज्जा सोडून थोडीशी बिनधास्त होते. निश:ब्दातच  त्यांचे गुज व्यक्त करून टाकते. म्रुद्गंधातून ते प्रेम ती आसमंतात भरून टाकते.  

त्यांचा हा विलक्षण प्रेम सोहळा खरच अवर्णनीय असतो. सारी सृष्टीच तो प्रेम-सोहळा, डवरलेल्या झाडं मधून, उमलत्या काळ्यांच्या नाजुकतेतून  आणि फुलांच्या सुगंधातून, साजरा करते. तिला तृप्त तृप करून सृष्टी खुलवून 'तो' पुन्ह: दूर जातो. परत येण्यासाठी! त्याचं हे शतकानुशतके चिरतरुण राहिलेलं नात आणिक सजवण्यासाठी!

आणि 'ती' पुन्हा:  झुरत रहाते त्याच्या प्रतिक्षेत...  पण यावेळी 'ती' च रूपड एखाद्या नव-विवाहिते सारख खुललेलं असत. 








                                                                                                 ...   रेश्मा आपटे