Monday 23 July 2018

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल


आज सकाळी उठले आणि सवयीने व्हॉट्स अप पहिले. वारकऱ्यांचे सुरेख फोटो, केशरी झेंडे, भक्ती, विश्वास  आणि समाधानाने भरलेले  सुंदर चेहेरे दिसले आणि मन एकदम प्रसन्न झाले. काही फॉर्वर्डस, मुख्यमंत्र्यांना पूजे पासून रोखले, भक्तीचे राजकारण, वारकऱ्यांची काळजी असल्यामुळे पंढरपुरास न गेलेलं मुख्यमंत्री आणि त्यांची पूजा स्विकारायला निघालेले विठ्ठल रखुमाई आणि काही अत्यंत बालिश विनोद असं बरच काही त्या सौंदर्यात  मिठाचे खडे टाकत होते पण त्या निरागस आणि निःस्वार्थी, निर्मळ चेहऱ्यांपुढे असे फॉरवर्ड्स विसरले जात होते. ती निर्मळता बघून ते विनोद आणि फॉरवर्ड्स ज्याचा त्याचा दृष्टिकोन शेवटी! असे म्हणून सोडून देता देता, चुकून डाउनलोड झालेला एक विडिओ प्ले झाला आणि  हरिनामाचा गजर मुक्तपणे कानी पडला. अत्यंत अद्भुत शक्ती या हरीनामात आहे. मंत्रमुग्ध करणारी. तना मनाला भुरळ घालणारी. लहान थोर सारे ठेक्यात नाचत झानजांचा नाद करत नाचत विठोबा माऊलीचा गजर करत होते.  खूप मित्रांचे मैत्रिणीचे फोटोज येत होते हॉकी मेडिकल हेल्प साठी, कोणी मोफत अन्न सेवा कोणी काय तर कोणी काय आपापल्या परीने त्या वारकर्यांना सेवा अर्पण करत होते. वारीची सुरुवात झाल्यापासून हे फोटोज मी नुसते पहात होते, दर वर्षी पहाते आणि पुढच्यावर्षी तरी योग येईल अशी आशा करते. यंदाही माझी खूप ईच्छा होती वारीला जायची तो अनुभव मनात साठवायची, आयुष्याला पुरेल अशी ऊर्जा शोषून घ्यायची पण यंदाही योग्य आला नाही. .

दर वर्षी एकादशीला हे असचं होतं. मन खट्टू होतं. पण आवरून कामावर निघावं लागतं. यावर्षी व्हिडीओ साठी आणि फोटोंसाठी मनोमन व्हॉट्सअप आणि मित्र मैत्रिणींचे
आभार मानले आणि निघाले. तर काय कलेक्टर ने सुट्टी दिल्याची बातमी अली. मग पूर्ण बिझी दिवस अचानक अर्धा दिवस काम वर येऊन ठेपला. बाहेर पडलेच आहे तर एक दोन काम करू असं ठरवून निघाले आणि रस्ते स्टेशन सगळीकडे दिंड्या आणि झांजा, बाळबोध हरिनाम याने वातावरण खूप सकारात्मक आणि भक्तिपूर्ण झाल्याचे दिसले.  मुंबापुरीतही  हातावरचे पोट भरत तारेवरची कसरत करणारा सामान्य माणूस घरातून अंमळ लवकर बाहेर पडला पंढरपुरात नाही तर मुंबापुरीतच पंढरपूरच्या वारीचा थोडा वेळ अनुभव घेऊन मस्टर भरायला धावला. तो भक्तिसागर, विलिनता आणि तन्मयता पाहून परत एकदा मुंबईकरांच्या स्पिरीट ची दाद द्यावीशी वाटली.
 हॅशटॅग भक्ती हॅशटॅग माऊली या पलीकडली भावना फेसबुक आणि इंस्टावर पण झळकली आणि ते दृश्य बघून त्या तल्लिनतेचा आस्वाद घेऊन मन तृप्त झाले. शांती, आनंद आणि  समाधान या त्रयीचा प्रत्येय गजबजलेल्या मुंबापुरीत आज वारीच्या दिवशी अनुभवायला मिळाला.

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!


No comments:

Post a Comment