Tuesday, 24 June 2014

बीन नावाच नात


देता आल तितक नेहमीच तू दिलस
भरल्या डोळ्यात हसू सुद्धा पेरलस

निराशेत आशा, काळोखात वात
एकटेपणात दिलीस निरंतर साथ

मलम झालास ठणकणाऱ्या जखमेवर
वाहत केलस पाणी पुन्हा एकवार

कोमेजल्या भावांना घालून अलवार फुंकर
करून गेलास साऱ्या  जाणीवांवर शिंपण

जागवलीस स्वप्न उघड्या डोळ्यांत
आणि रोमांच शरीराच्या कणाकणांत

क्षणही दिलास एक निसटता, मोहाचा
जपलेलं संचित बेभान  उधळण्याचा

सार सार देत मनाचा घेतलास ठाव
पण नाही दिलस कधी या ..

' बीन नावाच्या नात्याला "नाव" '…


                              रेश्मा आपटे

 

Sunday, 25 May 2014

निरोपाचा क्षण

बागडली दिसभर, कौतुकात न्हाली 

साज शृंगारात, ही नवरी  सजली 


आला निरोपाचा क्षण, दाटे  गहिवर 

निसटले काही हातून, वाटे क्षणभर 


मिठीत आईच्या, मुसुमुसती डोळे

बाबांच्या प्रेमाने, मन गलबले 


स्वप्न नवे आज, खुणावते जरी 

बावरते मन, पाऊल अडते दारी  


तितक्यात येई खंबीर, खांद्यावर हात  

जागवी विश्वास, पाणावल्या डोळ्यांत


त्याच्या सवे आज, चाले सासुराची वाट   

जपून मनात,  बंध नाळेचे अतूट                                       … रेश्मा आपटे

Monday, 14 April 2014

पुन्हा पुन्हा तू समोर यावे, अन पुन:पुन्हा मी गप्प व्हावे  बोलता बोलता शब्द सरावे, तुझ्याकडे मी पहात रहावे, 

पाहता पाहता मी हरवावे,  लाजून मग हळूच हसावे... 

शब्द कुठले कसे निवडावे, मनात ते कितीदा घोकावे

हळुवार मग तू जवळ यावे, कटाक्षात एका जिंकून घ्यावे...  

गुज मनीचे नजरेत झुरावे, स्पर्शात तुझ्या ते त्रिवार हरवावे, 

पुन्हा पुन्हा तू समोर यावे, अन पुन:पुन्हा मी गप्प व्हावे...  

Sunday, 2 June 2013

प्रेम

तस 'त्या' च 'ती' च नात फार जुनं!!

वर्षभर तिनं वाट पहावी, त्यान तिला झुरत ठेवावं, ती खूप तापली की, त्यान हळूच याव. काही क्षणांचाच सहवास पण तिनं लगेच तृप्त हसावं. तिचा पहीला राग ओसरला की, त्यानं पुन्हा गायब व्हावं. आलाय..  आता येईलच म्हणत तिनं पुन्हा प्रतीक्षेत झुरावं. तिनं खूप खूप निराश, नाराज व्हाव आणि मग त्याने पूर्णत: तिच्याकडे याव. त्याचा हा खेळ अगदी ठरलेला. तिला त्रास देण हा त्याचा छंदच जणू!

तो परत येतो..  तिला खुलवण्यासाठी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. पण ती काही बधत नाही . मग तोही हट्टाला पेटतो तोही मागे हाटत नाही. मग सुरु होते जुगलबंदी!!! 

तिचा राग त्याचा हट्ट, तिची तडफड त्याची तगमग, तिचे नखरे त्याच्या कला, तिची नजाकत त्याची कल्पकता, त्याने कधी हळूच याव तर कधी चिडून बरसाव, सगळे खेळ, सगळे उपाय त्याने करून पाहावे..   तिनं मात्र अबोला जपावा!  मग त्याचा धीर सुटतो. खचून त्याने तिला प्रेमाने कवटाळावे आणि तिने राग सोडून हळूच हसावे, त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा आणि  'त्या' च्या प्रेमात 'ती' ने भिजत रहावे. मग त्याने तिला आवेगाने जवळ करावे. त्या आवेगात ती गुदमरते आणि शेवटी त्याच्या आधीन होते. ती पूर्णपणे त्याची होते आणि तो तिला पूर्णत्व बहाल करतो. खुशीत येवून मग 'तो' गर्जत, गडगडत बरसून आपले प्रेम जगजाहीर करतो, 'ती'ही मग लज्जा सोडून थोडीशी बिनधास्त होते. निश:ब्दातच  त्यांचे गुज व्यक्त करून टाकते. म्रुद्गंधातून ते प्रेम ती आसमंतात भरून टाकते.  

त्यांचा हा विलक्षण प्रेम सोहळा खरच अवर्णनीय असतो. सारी सृष्टीच तो प्रेम-सोहळा, डवरलेल्या झाडं मधून, उमलत्या काळ्यांच्या नाजुकतेतून  आणि फुलांच्या सुगंधातून, साजरा करते. तिला तृप्त तृप करून सृष्टी खुलवून 'तो' पुन्ह: दूर जातो. परत येण्यासाठी! त्याचं हे शतकानुशतके चिरतरुण राहिलेलं नात आणिक सजवण्यासाठी!

आणि 'ती' पुन्हा:  झुरत रहाते त्याच्या प्रतिक्षेत...  पण यावेळी 'ती' च रूपड एखाद्या नव-विवाहिते सारख खुललेलं असत. 
                                                                                                 ...   रेश्मा आपटे 

Thursday, 4 April 2013

वेदना


बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही 
भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई 

वेदना मुकेपणाची, सलत आत राही  
निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही 
  
मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही 
पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही 

आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही 
आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती 

उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली 
जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई 


                 
     … रेश्मा आपटे 

Sunday, 16 December 2012

राधा

मोरपीस जणू फिरते तनी, 
वेणू नाद हा पडता कानी, 

काहूर मनात, अन हुरहूर आगळी 
मोहरते आठवता, छबी सावळी

थरथरते अधर, लाली गाली  
किंचित लाज, अधीर नयनी 

ललना साजिरी, नटली सजली  
शाम सख्यावर, आणिक भाळली

बावरे मन, अन आशा कोवळी 
मिलनास आसुसली, राधा भोळी  

पाहून अधीर राधा, बोले सखी 
"होईल बोभाटा ग गोकुळी!",

नयनी पाणी, मिटे पापणी 
अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!!


                                                                                               ... रेश्मा आपटे 

Friday, 23 November 2012

पाऊस

आज खूप दिवसांनी मी एकटी निवांत घरी होते. दिवेलागणीला देवासमोर समई  लावली आणि खिडकीतून डोकावले तर गार वार्याची एक झुळूक अंगाला अलगद स्पर्शून गेली. मावळतीच्या छटांनी आकाश सजल होत. त्यातच काही काळे ढग अवकाशात मुक्त संचार करत होते. वार्याचा वेग वाढला तशी झाडेही डोलू लागली. काही पिकली पाने उतरवून स्वत:चा भर हलका करू लागली. मावळतीच्या देखाव्याने सजलेल आभाळ अचानक रूपड पालटू लागल. काळी चादर पांघरलेल्या आभाळातून एक लख्ख वीज आभाळ कापत गेली, आणि पाठोपाठ चार-दोन थेंब धरणीवर सांडले आणि लुप्त झाले. त्याना पाहायला की काय कोण जाणे मागोमाग असंख्य थेंब ढगांतून मुक्त झाले. लहान मुलीसारखी मी खिडकी बाहेर हात काढून ते थेंब झेलायचा प्रयत्न करत होते.

माझा तो पोरखेळ मला थेट शाळेत घेऊन गेला. भिजायला मिळव म्हणून मुद्दाम छत्री विसरणारी मी, मग शाळेतून घरी आल्यावर आईचा ओरडा खायचा तोही पाऊस बघत. मग हळू हळू मोठी होत गेले, तशी पाऊस खूप काही शिकवत गेला. आईचा डोळा चुकवून पावसात ओरडत नाचत फिरणार्या मला कॉलेज मध्ये गेल्यावर त्या थेंबांशी गुज-गोष्टी कारण अधिकच आवडू लागल. मग हळू हळू ते थेंब अनुभवण आणि पडणाऱ्या पावसाचा तो आवाज मनात साठवण अस एक आगळच खूळ लागल. या पावसाने मग कधी खूप खूप स्वप्न दाखवली, त्या स्वप्नात मला झुलवल. काही चेहेरे त्यांच्या सहवासातले पावसातळे  सुंदर क्षण आज मला खूप प्रकर्षाने आठवत राहिले. काही विसरली वाटणारी माणस कशी काल-परवाच हातात-हात गुंफून चालत असल्यासारखी खरी खरी वाटायला लागली. ते चेहेरे, पावसात चिंब करणाऱ्या त्या आठवणी, मोहरणारे क्षण, आणि अचानक आठवली.. ती स्वप्न अशाच पावसात विस्कटलेली. आणि मग पावसानेच मदतीला येऊन डोळ्यातल्या पाण्यात मिसळून टाकलेले थेंब,, सार काही डोळ्यासमोर येत राहील. पाऊस बाहेर कोसळतच होता. मी ते पाणी पाहत होते. सतत कोसळणाऱ्या धारातून एक बाईक भरधाव जाताना दिसली आणि एक भिजरी संध्याकाळ हलकेच मनावर तरंगली, पुन्हा एकदा पावसाने मला हसवलं. तेव्हा सुंदर सुंदर वाटणारा पाऊस आजही रिमझिम करत मला गुदगुल्या करत होता. वाकुल्या दाखवत माझ्याबरोबर हसत होता.

ते आठवणींच चलचित्र पाहताना, वाटल मी स्वत:ला नव्याने ओळखतेय. काही आठवणींवर हसतेय तर काहीं आठवणींकडे एक समजूतदार नजर टाकून पुढे सरतेय. हे सगळ सुरु असताना माझा जुना पोरखेळ सुरुच होता. त्या टपोऱ्या थेंबाना ओंजळीत साठवायचा खेळ!!  पण ते टपोरे थेंब हातावर विसावले की कितीही हवे-हवेसे वाटले तरी ते हातून निसटून जात होते, भरली भरली वाटणारी ओंजळ हलकेच रीती करून जात होते. पण अचानक जाणवलं की ते ओंजळीतून निसटतानाही तळव्यांवर एक सुखद ओलावा ठेवून जातायत. त्या अनुभवाची अनुभूती आणि आठवणींची हवी-हवीशी वाटणारी खून हळुवार मागे ठेऊन जातायत. सरींतून कोसळणार ते पाणी माझ्या थेट मनापर्यंत पोहोचून मला तृप्त.. तृप्त करून गेल. पाऊस आज पुन्हा नव्याने शिकवून गेला.

हसवणारा, कधी रडवणारा, तर कधी रडवल्यावर कवेत घेणारा पाऊस... त्याच न माझ नातच वेगळ आहे. पाऊस म्हणजे पाणी...  मला भुरळ घालणारी एकमेव गोष्ट : पाणी! नदीच असो वा समुद्राचं, झऱ्यातून  खळाळणार, धबधब्यातून कोसळणार, किंवा अगदी नळातून वाहणार असो मला पाणी नेहमीच भुरळ घालत आणि सगळ्यात भावणार पाणी म्हणजे पावसाच्या स्वरूपात येऊन चिंब चिंब करणार. मला पाणी भावत कारण त्याला गती असते. ते कधी थांबत नाही चांगल वाईट सगळ आपल्यात सामावून घेत. पाऊस, पाणी वाहत असत अविरत आणि शिकवत असत जगण्याची प्रक्रीया. जे हव ते घेऊन आणि नको ते नेमक काठाला ठेऊन सतत गतिमान राहायचं. हातून निसटलेल्या क्षणांना आठवणीत जपायचं आणि त्या अनुभवातून शिकत राहायचं.!!!

                                                                                           ... रेश्मा आपटे