Wednesday 19 September 2018

हातात वाफाळलेल्या कॉफीचा कप घेऊन ती नुकतीच बाल्कनीत अली. झोपाळ्यावर निवांत टेकत असतानाच वातावरणात भरून राहिलेल्या मातीच्या गंधाने तिला गुंग केलं.  तिने कॉफीचा पहिला घोट घेतला आणि धुंद हवेत मन बेधुंद झालं.



कॉफीची चव जिभेवरून तरंगत तिच्या जाणिवेत उतरली आणि पावसाची रिमझिम जणू डोळ्यात साठली. कॉफी त्याला फारशी कधीच आवडली नाही पण तिला खूप आवडायची,10 वर्ष चहा करूनही तिला एक कप चहाचा अंदाज कधी जमलाच नाही मग उरला म्हणून, कधी तो ऐनवेळी नको म्हणाला म्हणून चहाची ओळख झाली आणि कॉफी जराशी मागे पडली पण कॉफी प्रेम ते मात्र तसच अबाधित राहिलं. दोघांनी भेटून विचार करून लग्न केलं एकमेकांचं वेगळेपण समजून आयुष्याकडून एकमेकांच्या अपेक्षा जाणून ते एकत्र आले. लग्नानंतर मात्र कसं कोण जाणे दोघांमध्ये दरी निर्माण झाली. एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये प्रेम हळू हळू घुसमटायला लागलं. त्याच तसं असणंं तीच तसं नसणं महत्वाचं वाटायला लागलं आणि खटके उडायला लागले. मोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नातं मुरलं की लोणच्याच्या फोडींसारखं मऊ होतं.

तिने वाट पहायची ठरवलं. तिचं त्याच्यावर अवलंबून असणं त्याला आधी सुखावून जायचं पण नंतर हेच खटकायला लागलं. बँक, बाजारहाट, घरातली काम याचबरोबर हळू हळू बल्ब बदलणे, इलेक्ट्रिशन ला बोलावणे, प्लमबर ची काम, ही मनात नसताना तिने स्वतःवर घेतली. यात स्री किंवा पुरुष हा भेद नव्हता तर आईकडे ही काम तिचे बाबा करायचे हा साधा हिशोब होता.
त्याचा डबा,आवडी निवडी, मूड, त्यांच्या पध्धती, स्वतःचं करियर सांभाळत त्याला खूष ठेवणं तिला कधी जमलंच नाही. नातं जपण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. काही वर्षांपासून ती त्याला सांगत होती, मला इतकं स्वावलंबी करू नकोस की माणसं नकोशी होतील उत्तराखातर, तुझी डिपेंडंसी मला जॉब सुध्दा शांतपणे करू देत नाही म्हणून तो फक्त चिडायचा.

चिडला की ओरडायचा, ती कशी काहीच करू शकत नाही आणि त्याला कशी टेंशन निभावावी लागतात यावरून खूप बोलायचा. ती खूप भांडली की सोडून जाईन निघून जाईन म्हणायची आणि तो चिडून, “बघ तुला काय करायचं ते” इतकच बोलायचा. जायची सोय नव्हती अस नाही पण मुलं संसार आणि तो तिला हवा होता. ती चिडायची रडायची आणि धमक्या द्यायची तिच्या सोडून जाण्याच्या पोकळ धमक्यांचा आता त्याच्यावर अजिबात परिणाम होतं नव्हता. रात्री भयंकर संतापलेला तो सकाळी काही घडलंच नाही असं वागायचा. चिडलो तर चिडलो त्यात काय इतकं अस म्हणायचा त्याचा मूड छान असला की त्याला तिनं हसायला हवं असायचं, त्याचा मूड खराब असला की तिने शांत बसून ऐकणं अपेक्षित असायचं अश्या वेळी ती माणूस आहे तिच्या मनात काही खदखदत असतं, तिला काही वाटतंय का? कामाचे व्याप आहेत का असले साधे विचारही त्याच्या मनाला शिवायचे नाहीत आणि मग तिच्या अपेक्षा आणि त्याच्या अपेक्षा एकमेकांना भिडायच्या आणि त्यातून सरावाचा वादंग उठायचा.

बोलून चिपड झालेल्या विषयांना परत परत गुर्हाळातून फिरवलं जायचं. मनं विरहित दोन शरीर फक्त सवय म्हणून जवळ यायची ती अधीरता त्यांच्या नकळत लुप्त पावली होती.
आणि आता तर काय सवय म्हणून सुद्धा जवळ येणं थांबलं होतं. एका छताखाली दोन दमलेले ओळख असूनही परके जीव प्रचंड मानसिक दबावाखाली रात्रीच्या कुशीत शिरत होते. पण संसार आणि मुलं हा हव्यास तिला सोडता येत नव्हता. नाही राहायचं तर जा सोडून हा मिजास पण तीच स्वत्व जगवू शकत नव्हता.

आणि मग तो दिवस उजाडला. नेहमीसारख शुल्लक गोष्टीने सुरू झालेलं भांडण पहिल्या वर्षी पासून खटकलेल्या मुद्यांनी भारदस्त बनलं आणि त्याने जा हवं तर म्हणताच ती शांतपणे उठली रात्री 2 वाजता बॅग भरली आणि निघाली. त्याचा विश्वास होता ती माहेरी जाईल आणि ८ दिवसांनी परत येईल पण तीच ठरलं होतं. ती निघाली! भरल्या घरावरून भिरभिरती नजर स्थिर करत त्याला म्हणाली,”हो मी करतेय मला हवे ते आणि इथून पुढे कोणी जा नाही म्हणू शकणार असं छत मी माझ्यासाठी बनवेंन.” ती त्यांची शेवटची भेट.

अंगावर उडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुषारांनी ती भानावर अली. तिच्या फसलेल्या संसाराच्या विचारात कॉफी थंड झाली होती.  कॉफीचा कप मायक्रो मध्ये ठेवला आणि स्वतःशी हसली. खरच मुलं असती तर तो संसार खेचत राहावं लागलं असतं. देवाला काळजी. आता त्यांच्यात खरच कोणताच दुवा नव्हता. त्यामुळे त्या रात्री नंतर त्याच्या कोणत्याही शपथा, अमिश, कबुली तिला थांबवू शकले नाहीत. त्याच्या आठवणीने आज तिच्या मनात कसलेच तरंग उठले नाहीत आणि ती विचारात पडली.

त्या रात्रीला आता पूर्ण 4 वर्ष झाली होती. पाहिलं वाहील स्वतः च घरं! ती आज तिच्या हक्काच्या घरात निवांत बसली होती.पुन्हा गॅलरीत येऊन तिने तिच्यासाठी केलेल्या त्या कॉफी चा एक घोट घेतला. तो कडवट, स्ट्रॉंग गंध आणि चव जिभेवर पसरली आणि मनाने 4 वर्षांच्या अविरत प्रयत्नांसाठी स्वतःलाच शाबासकी दिली.  तिच्या मनात खूप कोलाहल मजला होता. प्रचंड राग मनात घेऊन ती त्या रात्री बाहेर पडली होती. स्वतःच हक्कच घर झाल्यावर ती त्याला मुद्दाम फोन करून सांगणार होती. तुझ्यावाचून काहीच अडलं नाही माझं असं ठणकावून सांगून मन मोकळं करणार होती. पण ती कटुता गढूळपणा तळाशी जाऊन आज मन शांत होत. ती आता स्वतंत्र होती. पण एकटी. याच एकटेपणाला घाबरत ती नमतं घेतं होती. पण जेव्हा अती झालं तेव्हा तिने स्वतःचा मार्ग निवडला. ४ वर्ष स्वतःला सिध्ध करण्यात गेली. नोकरी मिळाली, स्वतःची कार झाली, आणि मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच घरं. अगदी ध्रुव बाळासारखं अढळ पद मिळाल्याचा आनंद झाला तिला. तिच्या आई बाबाना तिचा अभिमान वाटला.

त्या रात्री जे ठरवून बाहेर पडली ते करायला पूर्ण ४ वर्ष लागली. तिला वाटलं तिच्या जगण्याचा ड्रायविंग फोर्स हा तिचा त्याच्यावरचा राग आहे. त्याला दाखवून देण्यासाठी ती सगळी ताकद एकवटून ४ वर्ष झटली होती, आपसूचक तिच्या मनात विचार आला, तो द्वेष उरलाच नाही. मग आता पुढे? जगायला एक जीवनशक्ती लागते. पुढे जायला काहीतरी ध्येय लागते आता काय? या प्रश्नासरशी ती खिन्न झाली.

वाऱ्याच्या एका झुळकीने ती भानावर अली. कॉफी चा शेवटचा घोट घेतला आणि तिच्या मनात विचार आला, १० वर्ष संसाराला देऊन मग गुंत्यातून मोकळं झाल्यावर आता संसार नवरा नको पण ४ वर्ष्याच्या खडतर आयुष्यात दडपून टाकलेली तिची मातृत्वाची ओढ? आज तिन्हीसांजेला तिला अशांत करत होती. तिला तिचं ध्येय सापडलं सिंगल मदर!

ती लगबगीने उठली आणि त्याच रात्री अडॉप्शन हा ऑपशन तिने मनोमन स्वीकारला. तिला तिचा ड्रायव्हिंग फोर्स मिळाला होता आणि दोन एकट्या जीवांना एकमेकांची साथ लाभणार होती.


... रेश्मा आपटे



No comments:

Post a Comment