खूप अस्वस्थ होते मी सकाळ पासून. एक एक दिवस खरंच उजाडतो की एकही गोष्ट मनासारखी होत नाही. उठायला उशीर मग सगळं भराभर उरकाव तर मिस्कर लावला आणि लाईट गेले. धावत पळत स्टेशन वर पोचले तर ट्रेन डोळ्यासमोरून सुटली. मिळेलत्या ट्रेन मध्ये स्वतःला कोंबून घेत ई-मेल चेक केला. तर काय क्लायंट चा रिप्लाय "there was no attachment with mail kindly resend it" स्वतःचा किंवा जिला हा मेल करायला सांगितलं तिचा गळादाबावा असं वाटायला लागलं, कारण सकाळ पासूनची धावपळ व्यर्थ होती. आता draft पोहोचलाच नाही म्हणजे मीटिंग मध्ये काहीच अर्थ नव्हता आणि किमान घाटकोपर पर्यंत ट्रेन मधून उतरायला मिळण्याचा संबंधच नव्हता. एका वाईट दिवसाची सुरुवात झाली, ह्याची मला खात्री पटत होती कारण तेव्हढ्यातच माझ्या फोन ने बॅटरी लो चा सिग्नल दिला. दिवसाच्या सुरुवातीला फोन बंद पडण्याच्या मार्गावर होता आणि क्लायंट फोन वर फोन करत होता. त्या गच्च भरलेल्या ट्रेन मध्ये आणि गाजरे, खाण्याचे पदार्थ, perfumes आणि घाम यातून एक किळसवाणा गंध माझं मन अजूनच अस्वस्थ करत होता. त्यात ट्रेन मुंब्य्राला थांबली म्हणजे मी गडबडीत स्लो ट्रेन पकडली होती.
नवऱ्याचा फोन आला असं वाटलं त्याला सांगून टाकावं, मग म्हटलं काही गरज नाही, परत म्हणेल घाई घाई असते तुझी सगळी, त्यामुळे हे गोंधळ उडतात आणि मला तेव्हा तत्वज्ञान ऐकायची अजिबात इच्छा नव्हती. मग बॅटरी लो आहे असं सांगून फोन कट करून टाकला, आता अजून एक तास मला त्या गच्चं भरलेल्या ट्रेन मध्ये काढायचाय हे लक्षात घेऊन शेवटी मी सीट विचारली आणि अहो आश्चर्यम मला चक्क नाहूर सीट मिळाली त्यात ती मुलगी ठाणे गेल्यावर लगेच उठली वाह. त्यातल्या त्यात म्हणजे बसायला जागा मिळाली, तस मग जरा डोकं शांत झालं. उगाच ओंगळवाणा वाटणारा तो ट्रेन चा डब्बा जरा सुसह्य आणि सवयीचा वाटू लागला. माझ्या समोरच एक चिमुरडी हातात पाटी घेऊन बसली होती, त्या पाटीने माझं लक्ष वेधून घेतलं. मला खूप कुतूहल वाटलं. म्हणजे टॅब आणि i-pad च्या जमान्यात मुलीच्या हातात पाटी? मला आश्चर्यच वाटलं.
माझ्याजवळची cadbury दिली की लहान मुल एकदम friendly होतात हे मला माहित होत आणि तसचं झालं. त्या चिमुरडीला नाव विचारलं तर तिने पाटीवर मोत्यासारख्या अक्षरात "आशा" (name changed) अस लिहून दाखवलं. मला मज्जाच वाटली मग तिच्या आईशी गप्पा झाल्या तेव्हा तिने सांगितलं की त्या दोघी आशा च्या ट्रीटमेंट साठी जात होत्या कारण आशाला बोलता येत नाही. मोबाईल आणि टॅब त्यांना परवडत नाही म्हणून मग तिच्या आईने पाटीची शक्कल लढवली. ४ मुलात वेगळी वाटली की, आई तिला समजावते की तुझी पाटी डिस्चार्ज होत नाही आणि म्हणून तुला ती बाजूला ठेवायची गरज नाही.
"ऐकते का हो ही अस सांगून?" हा आपसूक प्रश्न मी विचारला तशी त्या म्हणाल्या," नाही ऐकत कधी कधी! पण परीयाय नाही हे समजून मग वापरते पाटीच. मोबाईल पेक्षा मला स्वतःला पटी आवडते परवडत नाही हे एकच कारण नाही. तर, ती पुसली की कोरी होते.आशाच्या ट्रीटमेंट मध्ये प्रत्येक अपयशानंतर मनाची पाटी पण अशीच कोरी करावी लागते आम्हाला आणि मग नवी उमेद त्या कोर्यापाटीवर मनातलं चित्र उमटण्याची. जेव्हा यशाच्या जवळ जाऊन काही उपाय फेल झाला अस समजतं तेव्हा मी हिच्याबरोबर बसून ह्या पाटीवर खूप रेषा मारते आणि मग पुसून टाकते जणू एक अभद्र दिवस पुसून टाकला मी आणि नवीन उमेद येते मला या पाटीमुळे!हीच उमेद तिला मिळावी म्हणून मग ही पाटी! अजून लहान आहे हे समजण्याची मानसिकता नाही तिची पण समजेल तेव्हा ह्या पाटीसाठी आभार मानेल ती माझे." बाजूच्या बाईने मधेच त्यांना परेल येईल आता अशी आठवण करून दिली, तशी त्या मायलेकी उठल्या मला टाटा करून आणि सीट खाली करून.
ऐकून मी सुन्न झाले. वाटलं खरंच सकाळचे ३ तास मनासारखे नाही गेले तर आपण दिवसालाच वाईट ठरवून टाकलं. अस करून कस चालेल? ते तीन तास पुसून टाकले तर दिवस झक्कास जाईल. पण जमेल का आपल्याला हे? कारण हे सगळं बोलायला ठीक असत पण करायला?
तेव्हढ्यात मला माझी जुनी मैत्रीण भेटली ट्रेन मध्ये. म्हणजे गर्दी कमी झाल्याने दिसली आणि तिच्याकडे चक्क पॉवर बँक होती. क्लायंट ला मेल मिळाल्याचं कॉन्फर्मेशन माझा फोने चालू होता क्षणीच मला दिसलं. एकूण दिवस रुळावर आला होता किंवा माझं डोकं, विचार रुळावर, ताळ्यावर आले होते. किंवा मग दिवस better होऊ शकतो या पॉसिटीव्ह विचाराने करामत केली होती. एकुणात माझ्या निगेटिव्ह विचारांची पाटी कोरी होऊन त्यावर डे प्लांनिंग पूर्ववत सुरु झालं होत.काही का असेना माझ रुटीन मी ठरवल्या प्रमाणे सुरु झालं.
local trains and philosophy
... रेश्मा आपटे
No comments:
Post a Comment