Tuesday, 8 November 2011

द्वंद्व

खुपदा कस होत की सगळ काही सुरळीत नियमित सुरु असतं. म्हणजे "रुटीन लाइफ़" सुरु असतं. तसं बघितलं तर सगळ कस जगाच्या जागी आणि नीट!! तरीही एक रुख-रुख असते एक अशांतता मनात घर करून असते. सगळ असून विरक्तीची भावना देणारी! प्रत्येक पाऊल लख्ख प्रकाशात पडत असतं पण.. पण त्याच प्रकाशात स्वत:चीच दिसणारी सावली!! ती मात्र मन झाकोळू पहाते. दिवसा-उजेडी अचानक काळोखाच्या स्वाधिन झालो असे वाटायला लागते. मनात आत आता काहीतरी सलत रहाते. संपूर्ण  आयुष्याला  पुरेल  असे नैराश्य बेसूर हसत जणू आपलं अस्तित्वच त्याच्यात सामावू पहाते. 

हल्ली खुपदा मला असेच होतं. मनाचा नुसता गोंधळ उडतो का कस? कश्यामुळे ? काहीच सुचत नाही ... :( .. खूप खूप confident वाटत असताना मध्येच भीती वाटते काहीतरी चुकेल, जमेल का? नक्की हे करू शकू ?? असे एक ना दोन १०० प्रश्न मनात येतात! प्रत्येक प्रश्नासरशी मनात एक नैराश्य, एक अस्वस्थता दृढ होत जाते. ही भावनाच विचित्र अपरीचित असते मला! आज पर्यंत कोणताही निर्णय घेताना मी खूप ठाम असायचे. पण मग अचानक हे असे का व्हावे? म्हणजे प्रेम भंग किंवा total अपयश वैगरे अशी काहीच भानगड नाहीये मग तरीही हे का? उत्तर नाहीत आणि सापडतही नाही प्रयत्नपूर्वक शोधून सुध्धा नाही, उरतात फक्त प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न मनाचा गोंधळ वाढवतो. एखादी गोष्ट सुरु करते किंवा करायचा निर्णय घेते पण त्यावर ठाम होता येत नाही. हे करू का? ते जमेलच किंवा मी ते जमावेनच याची स्वत:चच मन ग्वाही देत नाही...   मलाच होते आहे का असे? आणि का होते आहे? 

फक्त मीच? की माणसाचे मनच असे आहे, सगळ्यांच्याच मनात ह्या अश्या दोन परस्पर विरोधी भावना आशा आणि निराशा एकत्रित वास्तव्य करीत असतात? एक दुसर्यावर हावी होण्याची धडपड करत असतात?..  आणि जिचे पारडे ज्या वेळी जडं तसा त्या व्यक्तीचा मूड! किवा स्वभाव आशावादी किंवा निराशावादी!
 व्यक्ती एकच पण .. पण विचार अनेक.. प्रत्येकाच्याच मनात असतात ह्या दोन्ही बाजू सतत, सतत एकमेकांशी झगडणार्या! एक आशावादी, हसरी, उत्साही, प्रेराणादाई तर एक निराश, उदास, निराशावादी! सगळ्यांच्याच मनात दडलेल्या असतात दोन विरोधी भावना एक लख्ख प्रकाशासारखी स्वच्छ, निर्मळ तर दुसरी स्वत:बरोबर निराश करणारी काळोखात खेचत नेणारी कुट्ट काळ्या सावलीसारखी निराशावादी!!. 

माणसाचं इवलस ते मन पण..  भावना त्या मात्र अनेक! ते मन भारीच चमत्कारिक असत नाही, उगी नाचवत रहात, एका क्षणी सगळ काही शक्य वाटतं, तर पुढचाच निराश उदास क्षण सार काही अशक्य करून जातो. प्रत्येकजण नेहमीच एक झगडा, एक युद्ध अनुभवत असतो. आशा-निराशा दोघीही एकमेकीनवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. सतत सतत आपल्यावर ताबा मिळवू पहातात आणि आपण त्या पैकी एकीच्या स्वाधिन होतोही. कसे? कोणत्याक्षणी?  हे आपले आपल्यालाही नाही समजत! पण आशा-निराशेच्या मधली ती अदृश्या रेषा ओलांडून नेहमीच प्रत्येकजण एका बाजूला खेचला जातो. पण जोवर आपण रेषेच्या एका बाजूला असतो, मग ती कोणतीही असो, तोवर सगळाच ठीक असतं; कारण रोजचा दिवस सारखाच नसतो ना? पण जेव्हा कधी आपण त्या रेषेवर उभे असतो आणि तळ्यात मळ्यात सुरु असतं तेव्हा? तेव्हा काय? काय करायचं आणि कस आवरायचं मनाला? कस पुन्हा वेसण बांधून आशेच्या आश्रयाला सोडायचं?

हल्ली हे मी सतत अनुभवतेय एक द्वंद्व !! सतत मनात चालणार एक युद्ध. आशेचे - निराशेशी. उत्साहाचे- निरुत्साहाशी. punch  me असते ना तशी अवस्था झालीये माझी सध्या! त्या अदृश्या रेषेच्या अलीकडून आणि पलीकडून सारखेच धक्के बसतायत आणि मी मात्र गडबडतेय त्या रेषेच्या पलीकडे जाण्यासाठी. तो उत्साह खुणावतोय पण ते नैराश्य वरचढ ठरतेय माला वाकुल्या दाखवत परत परत स्वत:त कोंडतय! 

आणि मी झगडतेय प्राणपणाने बाहेर पडायला!!!  कशी? ते मात्र समाजात नाहीये. 

हे सगळ उतरवू की नाही इथे इतक _ve  नको लिहीत जाऊ असे काल एक मित्र म्हणाला पण माग विचार केला कदाचित हा एक मार्ग असू शकतो मनातला गोंधळ समजाऊन घ्यायचा आणि फायदा नाही झाला तरी तोटा तर नाहीच होणार ना? म्हणून मग खरडलं  ..........

                                                                                                ,,, रेश्मा आपटे 

2 comments:

  1. chhan muktak. vichar -ve asale tari utaravavet. kadhi kadhi tyatunahi +ve maarg sapadu shakato. :)

    ReplyDelete