Monday 13 July 2020

लॉक डाऊन : अनिश्चिततेतील निश्चित क्षण

सकाळ झाली.
माणूस नावाच यंत्र फिरू लागलं.
सरावाचे आवाज गजर, गिझर, मिक्सर, फोडणी, मोबाईलची रिंग,आवरा चा ओरडा, पाण्याची धार, डब्याची झाकण, उकळणार्या चहाचा वास. दूधवाला, पेपरवाला, घंटा गाडी, बाईक, रिक्षा, स्कुल बस, मुलांचा कलकलाट, बसचा हॉर्न, ब्रेक, ट्रेन ची धडधड
दिवस संपला.
माणूस यंत्रातील इंधन जरा कमी झाले.
घर नावाच्या भिंतीत पोचला. परत आवाज बायको, मुलं, आई बाबा, भांडी, कटकट, टीव्ही ची बोंबाबोंब, मोबाईलची रिंग, बातम्यांचा आणि बातमीदारांचा कंठशोश .
अंथरूण नावाच्या चार्जर वर अंग टेकल्यावर हाडांची कडकड.
आणि निरव शांततेत झोपेच्या आधीन व्हायच्या आधी येतो तो सर्वात भयानक आतला आवाज.
का कश्यासाठी असे प्रश्न. पण सारवलेला माणूस.. सरावानेच तो आवाज दाबला जातो. मग झोप, रात्रीच्या गर्भात विरघळून जातो तो. सकाळच्या निश्चित चाकोरीसाठी.
आणि एक दिवस, अचानक त्या देशाचे पंतप्रधान एका अपत्तीशी झुंजण्यासाठी चाकोरीला ब्रेक लावतात. इतका बाका प्रसंग की पूर्ण देश बंद(लॉक डाऊन).
माणूस यंत्र परत पळत सुटतं.
पुन्हा: आवाज टिव्ही चा, फोन चा, रांगा लावा ची ओरड, धान्याच्या ऑर्डर चा आवाज.
आणि मग एक शांतता.
एक दोन आठवडे आरामाचे जातात. मग सधन वर्गात अन्नपूर्णा संचारते. विविध पदार्थ बनतात. आणि हातावर पोट असलेला वर्ग उद्याच्या अन्नाच्या बाबतीत साशंक होऊ लागतो.
आवाज सुरूच असतात. आकडे शेअर मार्केट चे, वाढत्या रुग्णांमचे, लॉक डाऊन च्या उरलेल्या दिवसांचे. माणूस यंत्र गडबडून जातं. भिषण सवयीची नसलेली अनिश्चितता आणि पंढपेशी माणूस यंत्र आतून हलायला लागतं.
यंत्राला भावना दाटून येऊ लागतात. सवयच नसते आपल्या माणसात रमयची घरात बसायची.
खाऊ पिऊ ची मज्जा संपत जाते आणि 50% तरी पगार पुढल्या महिन्यात होईल का अशी भीती वर डोकं काढते.
चिंता, काळजी, निराशा, कंटाळा यात या माणूस यंत्राला जिवंतपणाची जाग येते. गरजांचं प्रमाण व्यस्त असलं तर कमी पैशात आपल्या माणसाच्या उबेत जगता येते असा साक्षात्कार होतो.
रोज रात्री झोपताना सरावाने दाबून टाकलेला तो आवाज ऐकायचं भान येतं. आपल्या आजूबाजूला, सूर्य पक्ष्यांच्या किलबिलाटात उगवतो. पक्षी, पाखरं झाडं सुरेल संगीत गुफतात हे नव्याने लक्षात येते. घर नावाच्या भिंतीना घरपण येऊ लागते. आणि धीर येतो माणूस यंत्राला माणूस म्हणून स्वतःशी संवाद साधायचा.
सुरू होतो एक नवा प्रवास.
अनिश्चीततेने शिकवलेला निश्चित क्षणात जगायचा प्रवास.

No comments:

Post a Comment