Thursday, 26 July 2018

Soulmate 2

भाग 2
तुझं ऐकलं मी लग्नाला पण नाही गेलो तिच्या, तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही ठेवला, वाटलं मुक्त केलं मी दोघांना फुकटच्या गुंत्यातून. माझही लग्न झालं. वेगळ्या आयुष्याची सुरुवात झाली. सगळं आलबेल होतं आणि ती पुन्हा भेटली. तुझ्या लग्नात. आधी ती वैतागली, मला टाळलं,अलिप्त राहिली पण राघव तिचा नवरा! त्याच्याशी ओळख करून देताना अवघडलेपण नव्हतं. माझ्या मनात खळबळ उडाली, म्हणजे मी मुक्त नव्हतो. ४ वर्षानेही तिच्या नजरेत मला गुंतवून टाकायची, अस्वस्थ करायची ताकद होती याची जाणीव झाली. त्या नंतर कसे माहीत नाही आम्ही परत बोलायला लागलो. एक वर्क असाईंमेंट पण एकत्र केली. आम्ही खूप बोलायचो, वेगवेगळ्या विषयावर. एकमेकांचा कंटाळा येणं शक्यच नव्हतं. मग माझी बायको तिचा नवरा अन चिल्ली पिल्ली मस्त जमून आलं.   

काहीही अगदी काहीही शेअर करायचो आम्ही एकमेकांशी. कोणा विषयीचा राग, मुलांचे प्रोब्लेम्स, वाचलेलं पुस्तक , तात्विक चर्चा नाहीतर फुटकळ जोक्स. पार्टनर चा खूप राग आला की ती व्यक्त करायला एक हक्कच ठिकाण होतं, करण आम्ही एकमेकांना जज करणार नव्हतो, जे जस व्यक्त व्हायचं ते ऐकून खूप विषयावर आम्ही सोल्यूशन काढली. आमची आमच्या नवरा किंवा बायको बरोबर ची नाती अधिक घट्ट केली. एकदा माझं आणि माझ्या बायकोच, शरयूच भांडण झालेलं, कडाक्याचं अशक्य झालं होत सगळं. नेहमी मतभेद असायचे आमच्यात आणि भांडणं पण. त्यादिवशी सगळंच असह्य झालं, मी "ती"ला फोन केला, भेटलो आणि आमच्या भांडणा विषयी सांगितलं. आत दडलेलं सगळं उघड करून सांगितलं तिला, "मी काहीही केलं तरी शरूला कळतच नाही. आम्ही समांतर रेषा आहोत आमच्या आयुष्याकडून अपेक्षा वेग-वेगळ्या आहेत. मला नाही वाटत आमचं आता जमेल. मला वेगाचं आयुष्य आवडतं तिला शांतता. पण मुलं आहेत मग खेचायचं." तिने मला सगळं बोलू दिलं मग शांतपणे विचारलं, "बर मग? काय करायचं? मी म्हटलं,"माहीत नाही, म्हणून तुला बोलावलंय ना?.". ती, " बरं बरं, एक गोष्ट समजून घेऊयात की, तुझी भाषा तिच्यापर्यंत नाही पोहोचते. तुला म्हणणं तर पोहोचवायचं, पण प्रश्नभाषेचा आहे. शरूची भाषा शोधून काढ. कसं आहे ना,तसं सांग जस तिला ऐकायला आवडेल. एकदा भाषा कळली आणि समोरच्याच्या भाषेत व्यक्त झालं की ते अपोआप पोहोचत समोरच्याला. मी भडकून म्हणालो, "तुला मूळ मुद्द्याशी नाही जाता आलं की भाषेला वळवून काहीतरी अगम्य बोलायला आवडतं का ग?" माझा आवेग बघून तिने मला पाण्याचा ग्लास पुढे केला. तो ढकलून देत मी तिला निघून जा म्हटलं. तशी तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली, " शांत हो आणि ऐक तर, मी काय म्हणतेय, काही तत्वज्ञान किंवा अगम्य बोलत नाहीये." मी शांत झालो आणि तिच्याकडे पाहिलं, तशी ती पुढे बोलू लागली, " प्रत्येकाची खरंच एक भाषा असते शब्दांची, कौतुकाची, स्पर्शाची, नजरेची, काहीतरी विशेष कृती करून व्यक्त व्हायची. मी शब्दांत व्यक्त होते. तुला माझ्या नजरेची आणि स्पर्शाची भाषा भावते. तू शरूसाठी खूप करतोस, तिला खूप ऍप्रिशिएट पण करतोस पण तुझ्या भाषेत. आता विचार कर तिला काय आवडतं ? त्या प्रकारे व्यक्त होऊन तर बघ. तिच्यावर किंतू परंतू न ठेवता प्रेम कर." ते भाषा प्रकरणं तेव्हा मला तितकस कळलं नाही. पण जाणून घ्यावं अस जरूर वाटलं. ती म्हणाली, मला सांग तिला कशाने खूप आनंद मिळतो?" "फुलं? बहुतेक!" मी म्हणलो.
ती:" मग घेऊन जा आणि भांडण मिटवा पाहिले".
आणि माझं घर वाचलं रे. खूपदा माझ्याशी बोलल्यामुळे तिच्या आणि तिच्या नवर्यात होणारे वाद टळलेत. आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जात होतो.

खरच आम्ही एकमेकांची ताकद होतो. हसत होतो, शिकत होतो, घडत होतो. दिवस जात होते. आम्ही खुश होतो, मुलं, संसार, पैश्याची चणचण, वर्क प्रेशर सगळं पेलत होतो. अधून मधून फोन किंवा भेट व्हायची आणि प्रत्येक भेट नवी ऊर्जा देऊन जायची.

Soulmates 1

भाग 1:
तिच्यातला एक कोपरा कायम तुझाच होता रे", ओंकार म्हणाला. कदाचित आधी तिला समजलं नाही किंवा तू कधी विचारलंच नाहीस,
मला हसायलाच आलं, “शक्यच नाही रे मित्रा”, आजही आधाराचा खांदा म्हणून ती मला बघतेय आणि माझीही हरकत नाहीये, मग आता हा भावनांचा खेळ कशाला? आता व्यक्त होण सोपं म्हणून का? आयुष्याच्या या वळणावर बरोबरची 3 किंवा 4 आयुष्य पणाला कोण लावणार? थोडक्यात काय तर एक साथी हवा, इंटेलेकचूअल कंपटीबीलिटी असलेला. ती कायमच होती ना आमच्यात, विश्वास प्रचंड आहे तिचा माझ्यावर, माझाही तिच्यावर. एका हाकेत मी असेन  तिथून धावत येईन हे तिला माहितेय, आणि आता मला त्या बदल्यात कसलीच कमिटमेंट नकोय. मी हे करतोय आणि करणार करण मला ते आवडतं. ती मला ही स्पष्टता दिलीये. मग आता ही खळबळ उडवण्याचं काय कारण? का ही प्रत्येक वेळी अशी गोंधळ उडवते रे? माझं आणि तीच कुटुंब त्यांच्या आमच्या आयुष्यातल्या जागा सगळं जिथल्या तिथे आहे. खूप निर्मळ नातं आहे आमचं, वासना रहित, मोकळ, मनातला कोणताही कोपरा सहज उलगडता येईल असं.

अमच्या मैत्रीकडे ती अश्याच नजरेने पहत आलीये ना कायम? आठवतं तिच लग्न ठरलं आणि मोकळेपणे फुलपाखरू बनत तिने हे आपल्याला सांगितलं, तेव्हा तूच विचारलंस ना तिला, तिच्या माझ्या मध्ये काय होतं म्हणून? आठवतं ती काय बोललेली ते? “आमच्या नात्याला नावाची गरज नाही, तो हिरा नाहीये नात्याच्या कोंदणात सजवायला, तो झरा आहे अखंड प्रेमाचा, स्नेहाचा, समजुतीचा आणि निर्मळ भावनांचा सतत वाहता झरा! मैत्री चा अर्थ जपणार आणि जगणार नातं आहे आमचं”. अश्या उत्तराची अपेक्षाच नव्हती आपल्याला तिच्यासारख्या इमोशनल आणि कन्फ्यूज मुलीकडून! आपण पाहत राहिलो तिच्याकडे तिचे शब्द अगम्य असल्या सारखे.

तेव्हा मला खूप राग आला होता रे. वाटलं मी फक्त ऑप्शन आहे का? कसला आलाय झरा? आणि निर्मळ प्रेमाचा स्रोत वैगरे? लागलं तर असुदेत म्हणून बाळगलेला एक मित्र वाटतो का मी तिला? भावनांशी खेळताना काहीच नाही का वाटतं हिला?. नातं नाही जोडता येणार आणि गमवायचाही नाही म्हणून अलंकारिक भाषेत प्रेमाच्या उदात्त कल्पनेत सजवलेला एक मित्र? की एक मुलगा?. अरे मी कधी म्हटलं असं उदात्त काही करतोय म्हणून? मला सगळं हवं होतं. मला ती हवी होती पूर्ण! घाबरणार्यातला मी नव्हतो पण, नाही बोललो काहीच तेव्हाही. सेटल या व्याख्येत मी बसत नव्हतो तसाही तेव्हा. वेळ गेलेली हातातून, मग सगळं मनात ठेवलं बांधून.
फक्त बरं म्हटलं . तू खुश ना यावर तीच “ हो” ऐकलं आणि आतून राग दुःख याची जागा सुखद आनंदाने घेतली, सहज म्हणून गेलो, “कायम तुझ्या बरोबर असेन मी, तुला लागेल तेव्हा”. ती म्हणाली, "मी ही आहे कायम तुझ्याबरोबर". आपल्याला माहितेय हे मग बोलायची खरच गरज आहे का?”. चल येते असं म्हणत तिने मला मिठी मारली.

ओंकार न राहून मध्ये बोलला, "तेच तर ना, मित्रा अरे तू तेव्हाही बोलला नाहीस. तिला काही वाटतं का? तेही समजून घेतलं नाहीस. तुझं तूच ठरवलंस अगदी सगळं. ती लग्न करतेय, तिला माहीत नाही तुझ्या मनात काय आहे,मग तिने काय समजावं? मित्रा तू कधीच काहीच नाही बोललास. आता म्हणतोस उदात्त कल्पनेत मी अडकलो नव्हतो मग का नाही बोललास? तेव्हा कोणत्या अगम्य सक्रीफाईज मोड मध्ये होतास?"
त्याला मध्येच थांबवत मी म्हटलं,
ओमी, तिने मला मारलेली मिठी! ती जाणीव शब्दांत व्यक्त नाही करता येणार. ती जाताना तू मला काहीतरी सांगत होतास माझ्या मेंदूपर्यंत गेलच नाही रे ते. माझ्यासारख्या प्रॅक्टीकल माणसाला अस व्हावं नवलच! तीचा विषय निघतो तेव्हा आजही काही चूक बरोबर कळत नाही. तेव्हा तर गोष्टच वेगळी होती. ओम्या  तेव्हा भावनांचा इतका कोलाहल होता की, व्यक्त नाही होता आलं मला. म्हणून आज बोलतो तुझ्याशी, अरे तिने त्या दिवशी मला मिठी मारली, मला वाटलं माझा ताबा सुटेल पण मी त्या मिठीत मी शांत झालो. आमचं नातं जणू फक्त तिलाच समजलेलं, मी भ्रामक कल्पनेत जगत होतो असं वाटलं. त्या स्पर्शात त्या मिठीत “ इसी बहाने छू तो लिया” ही पुरुषसुलभ कल्पना मला शिवली पण नाही. तर एक शांतता, आधार, अद्भुत जाणीव अनुभवी मी त्या मिठीत. ती गेली, मी ते पचवत होतो.
क्रमशः

Monday, 23 July 2018

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल


आज सकाळी उठले आणि सवयीने व्हॉट्स अप पहिले. वारकऱ्यांचे सुरेख फोटो, केशरी झेंडे, भक्ती, विश्वास  आणि समाधानाने भरलेले  सुंदर चेहेरे दिसले आणि मन एकदम प्रसन्न झाले. काही फॉर्वर्डस, मुख्यमंत्र्यांना पूजे पासून रोखले, भक्तीचे राजकारण, वारकऱ्यांची काळजी असल्यामुळे पंढरपुरास न गेलेलं मुख्यमंत्री आणि त्यांची पूजा स्विकारायला निघालेले विठ्ठल रखुमाई आणि काही अत्यंत बालिश विनोद असं बरच काही त्या सौंदर्यात  मिठाचे खडे टाकत होते पण त्या निरागस आणि निःस्वार्थी, निर्मळ चेहऱ्यांपुढे असे फॉरवर्ड्स विसरले जात होते. ती निर्मळता बघून ते विनोद आणि फॉरवर्ड्स ज्याचा त्याचा दृष्टिकोन शेवटी! असे म्हणून सोडून देता देता, चुकून डाउनलोड झालेला एक विडिओ प्ले झाला आणि  हरिनामाचा गजर मुक्तपणे कानी पडला. अत्यंत अद्भुत शक्ती या हरीनामात आहे. मंत्रमुग्ध करणारी. तना मनाला भुरळ घालणारी. लहान थोर सारे ठेक्यात नाचत झानजांचा नाद करत नाचत विठोबा माऊलीचा गजर करत होते.  खूप मित्रांचे मैत्रिणीचे फोटोज येत होते हॉकी मेडिकल हेल्प साठी, कोणी मोफत अन्न सेवा कोणी काय तर कोणी काय आपापल्या परीने त्या वारकर्यांना सेवा अर्पण करत होते. वारीची सुरुवात झाल्यापासून हे फोटोज मी नुसते पहात होते, दर वर्षी पहाते आणि पुढच्यावर्षी तरी योग येईल अशी आशा करते. यंदाही माझी खूप ईच्छा होती वारीला जायची तो अनुभव मनात साठवायची, आयुष्याला पुरेल अशी ऊर्जा शोषून घ्यायची पण यंदाही योग्य आला नाही. .

दर वर्षी एकादशीला हे असचं होतं. मन खट्टू होतं. पण आवरून कामावर निघावं लागतं. यावर्षी व्हिडीओ साठी आणि फोटोंसाठी मनोमन व्हॉट्सअप आणि मित्र मैत्रिणींचे
आभार मानले आणि निघाले. तर काय कलेक्टर ने सुट्टी दिल्याची बातमी अली. मग पूर्ण बिझी दिवस अचानक अर्धा दिवस काम वर येऊन ठेपला. बाहेर पडलेच आहे तर एक दोन काम करू असं ठरवून निघाले आणि रस्ते स्टेशन सगळीकडे दिंड्या आणि झांजा, बाळबोध हरिनाम याने वातावरण खूप सकारात्मक आणि भक्तिपूर्ण झाल्याचे दिसले.  मुंबापुरीतही  हातावरचे पोट भरत तारेवरची कसरत करणारा सामान्य माणूस घरातून अंमळ लवकर बाहेर पडला पंढरपुरात नाही तर मुंबापुरीतच पंढरपूरच्या वारीचा थोडा वेळ अनुभव घेऊन मस्टर भरायला धावला. तो भक्तिसागर, विलिनता आणि तन्मयता पाहून परत एकदा मुंबईकरांच्या स्पिरीट ची दाद द्यावीशी वाटली.
 हॅशटॅग भक्ती हॅशटॅग माऊली या पलीकडली भावना फेसबुक आणि इंस्टावर पण झळकली आणि ते दृश्य बघून त्या तल्लिनतेचा आस्वाद घेऊन मन तृप्त झाले. शांती, आनंद आणि  समाधान या त्रयीचा प्रत्येय गजबजलेल्या मुंबापुरीत आज वारीच्या दिवशी अनुभवायला मिळाला.

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!


Thursday, 28 June 2018

ठाणेकर ती

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते डोंबिवली हा स्लो लोकल ने दिड तासाचा प्रवास. त्यात उन्हाचा जोर. गरम हवेने वैताग आला होता. काही जणी पेंगत होत्या स्वतःच डोकं धडावर न सावरता मुक्तपणे बाजूचीचा खांदा स्टॅन्ड म्हणून वापरला जात होता. काही जणी कानात बूच घालून पिक्चर बघण्यात, गाणी ऐकण्यात मग्न होत्या. माझ्या फोन ची बॅटरी मारायला टेकली असल्याने आणि मला झोप येत नाही म्हणून मी टक्क जागी होते (ज्याचा खरंतर मला राग येत होता) दादर आलं आणि एक मुलगी ट्रेन मध्ये चढली.माझ्या बाजूच्या सीटवर जागा मिळवत प्रसन्न हसली! इतक्या अस्वस्थ आणि कंटाळवाण्या वातावरणात ती इतकी प्रसन्न हसली म्हणून मला वाटलं कोणी ओळखीची असेल. मनात बऱ्याच जुळणाऱ्या चेहऱ्यांची उजळणी आपसूक सुरु झाली पण ओळख काही पटेना. तेव्हढ्यात तिने पाणी मागितलं. मी सहज बाटली पुढे केली. ती परत करताना म्हणाली किती उकडतंय नाही आज. मी ओठ फाकवत हसल्यासारखं काहीतरी केलं. डोक्याला भुंगा लागला होता,कोण असेल ही मुलगी? कुठे चढलीस? एकेरीवर अली म्हणजे नक्की ओळखते. 
मी: सी एस टी. 

ती:मी दादरला चढले. ऊन मस्त पडलंय यंदा म्हणजे आंबा छान मिळेल असं वाटतंय. 

मी न राहून विचारलं, चेहरा ओळखीचा वाटतोय पण नेमकं कुठे भेटलेलो आपण ते काही आठवत नाहीये. 

ती: छे छे मलाही नाही आठवते म्हणजे आपली ओळख आत्ता दादरला मी चढले तेव्हांचीच की!

मी बरं म्हणत संभाषण तोडलं. राग आला मला डोक्याला ताण दिल्याचा आणि त्या वैतागवाण्या बाईवर वेळ घालवल्याचा. 
ती: मला सांग ओळख कशाला लागते? आपण ट्रेन मधून जातो ४ चांगले शब्द बोललो एकमेकांशी की छान जातो दिवस. मी पूर्ण दुर्लक्ष करण्याचं धोरण अवलंबल. डोळे मिटून झोपेचं सोंग, हमखास कटकट सोडवणारी युक्ती. पण घाटकोपर गेलं आणि ट्रेन काही हलेना. डोळे उघडले आणि बाजुचीने  मौके पे चौका मारला. ती परत सुरु झाली. मरणाच्या उकड्यात नी घामात हिला विषय कसे सुचतात याचच मला नवल वाटत होत.समोर उभ्या असलेल्या काकूंची दया येऊन मी त्यांना माझं आसन दिल नी एका पायावर शरीराचा भार सांभाळत उभी राहिले. तर ही बाया परत बोलायला लागली,"कुठे उतरणार?" मी म्हटलं डोंबिवली. मला म्हणे नवल आहे डोंबिवलीच्या बायका सीट देत नाहीत असं ऐकलेलं म्हणून म्हटलं तू नसशील डोंबिवलीची. खूप शब्द अचानक डिवचलं गेल्यासारखे बाहेर येऊ पाहत होते पण त्यामुळे तिला आणखी विषय मिळेल असा विचार करून मी ते शिताफीने मागे फिरवले. तितक्यात दिलेल्या सीट ची किम्मत राखत त्या काकू बोलल्या तू नाही ना डोंबिवलीची तरी नाही दिलीस ना सीट आता गप बस. 

माझ्या मनात विचार आला याना डोंबिवली पर्यंत सीट देऊन टाकू पण तोही मी शिताफीने मागे हाकलला आणि दुर्लक्ष मोहीम सुरु केली. माझे पेशन्स लोकल ट्रेन ने खूपच वाढवलेत हे मात्र खरं. पण थांबेल तर ती बाया कसली? 
ती : नाही मी डोंबिवलीची नाही ठाण्याची आहे. मध्यवर्ती ठाणे. लग्नांनंतर ठाणेकर. (विचारलं का तुला?)मी आपलं सहज म्हणून म्हटलं हो दुखवायचा हेतू नव्हता माझा कोणाला. आपलं बोलायला विषय काहीतरी नाहीतर हा ट्रेन प्रवास असह्य होतो. माझ्या चेहऱ्यावरचं स्पष्ट दिसणारं इरिटेशन पाहून ती परत हसून बोलायला लागली, अग चिडतेस काय? खरंच हेतू नाही ग कोणाला त्रास द्यायचा. पण पहा म्हणजे पटलं तर! (अजून ही बया बोलतेचं आहे, एक थोत्रित ठेऊन द्यावीशी वाटली तिच्या. पण ते शक्य नव्हतं ना मग प्रचंड राग आला की १० ते १ असे आकडे मोजायचे मनात असं आजोबांनी सांगितलेलं आठवलं. पण तिची न थांबणारी बडबड १००० पासून उलटे अंक मोजले तरी माझा राग आता अनावर करेल अशी चिन्ह दिसली.) इतके हिंस्त्रक विचार मनात चालू असताना हीच आपलं सुरूच.. 

तर पटतंय का बघा, म्हणजे ट्रेन आपल्या गतीने जाणार. ही गरमी, गर्दी यात आपण काहीच बदलू शकत नाही. त्यात आजूबाजूच्यांचे वैतागवाणी उसासे, कवलेले चेहेरे आपला त्रास आणि ताप वाढवणार, वैतागत प्रवास संपवणार आपण आणि तीच वैताग, चिडचिड अश्या भावनांची लागण आपण घरी जाऊन करणार. मग सासू, मुलं कोणीच नाही तर हक्काचा नवरा यांवर चिडणारं मग चिडचिड करून त्रासात झोपणार आणि एक वाईट दिवस संपला असा उसासा सोडत झोपणार तेही अशांत झोपेमुळे दुसऱ्या खराब दिवसाची सुरुवात करण्यासाठी." ..( अजब, होतं खरं असच! जणू फास्ट फॉर्वड मध्ये तिने तो दिवस दाखवला मला. आपसूक मी ऐकायला लागले..) " तर बिघडलं कश्यामुळे? ट्रेन? ऊन? गर्दी? माझी बडबड? की फक्त आपला दृष्टिकोन? पॉसिटीव्ह विचारांची लागणं पटकन होत नाही पण एक वैतागवाणा उसासा सगळ्यांना वैताग देतो. म्हणजे ती काही आपली चूक नाही पण निगेटिव्ह इमोशनचं कौतुक जरा जास्तीच होतं. असो. तर मुद्दा असा की, आपला पुढचा दिवस कसा जाणार हे या क्षणावर ठरत. मग वैतागण्यापेक्षा आपण शांत राहू परिस्थितीशी सुसंगत होऊन आपली मनं शांत ठेऊ. म्हणजे मग माझी बडबड, या ट्रेन चा ओंगळवाणा प्रवास सुसह्य होईल आणि कदाचित आपण हसत घरात जाऊ, त्यानंतर शांतपणे घराची कामं करू, कोणाचाही रागच नाही येणार कारण मन आनंदी असेल. एखादं छान गाणं लावू, नवऱ्याला चांगला वेळ देऊ आणि एक सुंदर दिवस रात्रीत बदलेलं" सगळं कस डोळ्यासमोर साकार झाले. 

कल्पनेनेच खूप उत्साह आला. आणि तेव्हढ्यात ट्रेन सुरु झाली. आम्ही तिघींनी हसून एकमेकींकडे पाहिलं आणि बाकीच्यांचे उसासे ऐकून अजून हसू आलं. वाह एका सुंदर संध्याकाळची सुरुवात मध्यवर्ती ठाणेकरणीने करून दिली होती. 

अचानक सगळं सुसह्य वाटायला लागलं. घरी गेल्यावर करायच्या कामांची डोक्यात गर्दी न होता चेक लिस्ट बनली आणि ट्रेन एकदाही न थांबता डोंबिवलीत पोहोचली. 


Friday, 11 May 2018

शब्द शब्द खेळती मस्त
शब्द शब्द कधी स्वस्थ
शब्द शब्द ती करी बंदिस्त
शब्द शब्द हे तिचे दोस्त

शब्दांशी तिचे नाते अव्यक्त
शब्दांस  देई ती अस्तित्व
शब्दांत तिचे सापडे स्वत्व
शब्दांवर तिची सगळी भिस्त
शब्द शब्द कवितेत बद्ध
शब्द शब्द तिच्यावर लुब्ध
शब्द शब्द (तिचे) सगळे मुग्ध
शब्द शब्द  (तिचे) करीती स्तब्द

शब्द जमुनी आले
शब्द शब्द गीत झाले
शब्द शब्द गुंफून सारे
शब्द शब्द व्यक्त झाले


लग्न

लग्न लग्न म्हणजे नक्की काय असत ?


भेटी गाठी, रंग गंध, खूप सारा आनंद
एक तो स्वच्छंद, एक तिच्यातले द्वंद्व

वेणी फणी, साडी चोळी, गालांवर लाजेचा कुंद
एक ती राधा अन एक तो मुकुंद

चुडा मणी, कानी डूल, ओठांवर हास्य रुंद
एक तो अधीर, एक ती धुंद

दोन मन, दोन कुटुंब, अनोखा ऋणानुबंध
एक तो गंध, एक ती वाऱ्याची झुळूक मंद




                                      ... रेश्मा आपटे



Wednesday, 17 January 2018

२६ जानेवारी - प्रजसत्ताक दिन

जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवी स्वप्नं, नव्या योजना, सगळी नवलाई. इंग्रजी वर्षाची सुरुवात होते आणि नव्या कालनिर्णयाचा सुवास अनुभवताना पहिली नजर जाते ती नवीन वर्षातल्या सुट्ट्यांवर. पहिली आणि हक्काची येणारी सुट्टी म्हणजे २६ जानेवारी. खूपदा आपण ती आठवड्याच्या सुरुवातीला आहे, की शेवटाला जोडून हे पाहतो, फिरायला जाण्याचे, पिकनिकचे बेत बनतात आणि २६ जानेवारी एक सुट्टी बनून उरते!

फिरायला जाणे कुटुंबाला वेळ देणे यात गैर असे काहीच नाही, पण २६ जानेवारीला असलेले ऐतिहासिक महत्व पुढल्या पिढीला कसे कळणार? कोण सांगणार त्यांना, की २६ जानेवारीला सुट्टी का असते? इतिहासात अशी कोणती घटना घडली आहे की तो दिवस राष्ट्रीय सुट्टीचा असतो? अलीकडे झेंडावंदन उरकायचे आणि मग सुट्टीचा कार्यक्रम सुरु अशी मानसिकता झालेली दिसते. हा लेख म्हणजे महान भारतीय संविधानाशी अल्पसा परिचय आहे. 

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाच्या निष्ठा, धर्म आणि चालीरीती तसेच बोलीभाषेत प्रांताकनिक विविधता आढळते. वेगवेगळ्या आचार विचार आणि धार्मिक निष्ठेच्या माणसांचे लोकशाहीवर आधारित राष्ट्र निर्माण करणे आणि ते कार्यान्वित ठेवणे तसेच देशाची एकात्मता व आखडता या विविधेतही जपणे हे एक मोठे आव्हान आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा होते. त्यासाठी स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून आम्हाला काय करायचे आहे याची वैचारिक स्पष्टता तसेच विविधतेला व व्यक्ती स्वातंत्र्याला धक्का ना पोहोचवता साखरी यंत्रणा तयार करणे  व त्या साठी नियम बनवणे गरजेचे होते. भारतीय संविधान म्हणजे या सर्व आव्हानांना उत्तर आहे. या लेखात आपण संविधान म्हणजे काय आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये सध्या सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. संविधान म्हणजे काय आणि कोणत्याही देशात संविधानाला महत्वाचे स्थान का आहे  हे समजून घेणे सगळ्यात आधी महत्वाचे आहे.  संविधान राजकीय मूलभूत तत्वांना एका चौकटीत बांधते, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची सांगड घालते. थोडक्यात संविधान हे नियम, कायदे आणि हक्क याचा संच म्हणून काम करते. संविधाना शिवाय देश म्हणजे चालकाशिवाय वाहन असते.

भारत हा लोकशाही देश आहे आणि कोणतेही लोकतंत्र हे संविधानाशिवाय कार्यरत राहूच शकत नाही. भारतीय राज्य घटनेला ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे.  भारतीय संविधान हा भारतातील सर्वोच्च कायदा असून हा एक जिवंत दस्तावेज आहे. संविधानाच्या आधारे भारतात सरकारी यंत्रणा कार्यराय आहे. शासकीय संस्थांची संरचना, कार्यपद्धती, अधिकार व कर्तव्येही  संविधानाने प्रस्थापित केली आहेत. आपल्या संविधानाने नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देश तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. भारतीय संविधानात आतापर्यंत झालेल्या एकूण अंदाजे ९८ दुरुस्तीच्या आधारे एकूण ४४८ आर्टिकल्स ( कलमे),  २५ पार्ट्स (भाग), १२ शेड्युल्स आणि  ५ अपेंडिक्स (परिशिष्ठे) आहेत व संविधानाला एक प्रस्तावना आहे.  भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा मूळस्रोत म्हणजे संविधान आहे. आपले संविधान हे कॅलिग्राफी करून हस्ताक्षरात इंग्रजी व हिंदीमध्ये  लिहिण्यात आले आहे. 

भारताचे संविधान हे २६ जानेवारी १९५० रोजी अमलात किंवा लागू करण्यात आले म्हणून २६ जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. इ.स १९४६ रोजी त्रिमंत्री योजनेतील तरतूदींनुसार घटना समिती अस्तित्वात आली. घटना समितीचे काम सुमारे  ३ वर्षे सुरु होते व २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी घटना  समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची अखेरची सभा झाली व २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्य घटना अंमलात आली. भारतीय संविधान निर्मिती हा एक प्रदीर्घ प्रवास होता ज्याची सुरुवात स्वातंत्रपूर्व काळापासून झाली होती. घटना समितीत असलेल्या दिग्गजांनी प्रत्येक बाबींवर  बारकाईने चर्चा करून त्यानंतर घटनेचा मसुदा तयार केला. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या नेतृत्वा खाली घटनेचा मसुदा लिहिण्यात आला. भारताची घटना ही लिखित स्वरूपात असून संविधानाची प्रस्तावना, तिचे स्वरूप आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून काय व्हायचे आहे हे स्पष्ट करते.

भारतात लोकशाही पद्धतीने कायद्यावर आधारलेले राज्य साकार करणे हा संविधान समितीचा उदात्त हेतू होता. भारतीयांची मानसिकता, अस्पृश्यतेसारख्या वाईट प्रथा बंद करणे, समान संधीचा अधिकार अशी अनेक उद्दिष्ट्ये संविधान निर्मितीच्या वेळी समोर होती.  भारतीय घटनेला मूर्त स्वरूप देताना लोकशाही कशी असावी, पुढील अनेक वर्ष्यांच्या बदलत्या जीवनमानाप्रमाणे घटनेत तुरुस्तीची तरतूद, मानवी मूलभूत अधिकार, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताची घटना सर्वोत्तम व परिपुर्ण व्हावी यासाठी जगातील प्रमुख देशांच्या घटनेचा अभ्यास करून त्यातील उत्तम वैशिष्टयांचा समवेश भारतीय घटनेत करण्यात आला आहे. त्यातील काही प्रातिनिधिक संकल्पना व देश पुढील प्रमाणे आहेत. 'संसदीय लोकशाही'ची संकल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेतून तर 'संघराज्याची' संकल्पना ही अमेरिका व कॅनडा या संघराज्याच्या राज्यघटनेतून भारतीय संविधानात घेण्यात अली आहे. तसेच "न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना' अमेरिकेच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेला मिळाली आहे. जर्मनीतील वायमार प्रजासत्ताक घटनेवर आधारीत 'आणीबाणीचा' समावेश आपल्या संविधानात दिसतो तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतील "घटना दुरुस्ती"ची संकल्पना भारतीय राज्य घटनेचा भाग बनली आहे. भारतीय संविधानातील 'मूलभूत हक्कां'ची संकल्पना  ही अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा व फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली  सनद  यावर आधारित आहे. तर 'मार्गदर्शक तत्वां'ची संकल्पना आयर्लंडच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे. सातव्या परिशिष्टातील ३ सूचीची संकल्पना ही ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारली आहे.  

भारतीय संविधान परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी संविधानात सुधारणा करण्यात आल्या आहेत घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न पोहचवता घटना दुरुस्तीची तरतूद घटनेत केलेली आहे. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेच्या सरनाम्यात "समाजवादी" व "धर्मनिरपेक्ष" या शब्दांचा समावेश करण्यात आला. संविधानात कायदे करण्याचा अधिकार हा भारतीय संघराज्याला व त्यातील राज्यांना बहाल केलेला आहे. संविधानातील ३ सुचिंमध्ये कोणत्या विषयावरील कायदे केंद्र, राज्य सरकारला करण्याचे अधिकार आहेत हे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे, तसेच केला जाणारा प्रत्येक कायदा हा संविधानाला व त्यातील तरतुदींना धरून असावा हे अनिवार्य करण्यात आले आहे.  संविधानास धरून नसलेला कोणताही कायदा हा अवैध ठरविण्याची तरतूदही संविधानात आहे. काळाची गरज ओळखून संविधान दुरुस्तीद्वारे सन  २००२ रोजी घटनेत कलम २१ अ चा अंतर्भाव करण्यात आला व त्या नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांकरिता शिक्षण हा स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क बनविण्यात आला. सदर घटना कलम २१ अ नुसार माजी पंतप्रधान मा. मनमोहन सिंग यांनी शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा राष्ट्रास समर्पित केला. भारतीय संविधानाच्या ३ऱ्या भागात मूलभूत हक्कांची नोंद करण्यात अली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाला आर्टिकल ३२ नुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आणि रक्षण करण्याच्या हेतूने पालकत्व बहाल करण्यात आले आहे, म्हणजेच यापैकी कोणत्याही मूलभूत हक्कांची पायमल्ली झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची तरतूद आहे. भारतीय संविधान हे आचार, विचार, श्रद्धा, धर्म आणि उपासना याचे स्वातंत्र्य व सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय तसेच सर्वांना  देते तर सामान दर्जा आणि संधी यांची शाश्वती देते. निवडणूकिंची पद्धत निश्चित करून कायद्याने सज्ञान म्हणजेच १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. जगातील अनेक राज्यामध्ये अजूनही स्त्रियांना मतदानाचा अधिकार नाही परंतू सामान संधीचा अधिकार आणि लैंगिकतेवर भेदभावाला बंदी या तत्वांप्रमाणे संविधाना निर्मितीपासूनच स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल केलेला आहे.  भारतीय संविधानातील तरतुदी संबंधित अधिकारांचे रक्षण, राष्ट्राची प्रतिष्ठा व अखंडता अबाधित राखणे तसेच हक्कांचे रक्षण करणे आणि भारतात लोकशाहीचा व लोकांचा आदर सुनिश्चित करतात.  भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिहीत संविधान असून ते जगातल्या मोठ्या सामाजिक दस्तावेजांपैकी एक आहे. 

भारताच्या संविधाचा एक भाग म्हणजे त्याची प्रस्तावना! प्रस्तावना ही कायद्याच्या दृष्टीने संविधानाचा भाग मानण्यात येत नसली, तरीही ही प्रस्तावना संविधानाची उद्दिष्ट्ये आणि संविधान निर्मात्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करते. संविधानाच्या प्रस्तावनेचा मुक्त मराठी अनुवाद पुढील प्रमाणे आहे:
                                     " आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम,
                                       समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडण्याचा
                                       व त्याच्या सर्व नागरीकांस :
                                                   सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय:
                                                  विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
                                                                     व उपासना यांचे स्वातंत्र्य:
                                                                   दर्जाची व संधीची समानता:
                                         निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
                                         आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
                                                        व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
                                                         यांचे आश्वासन  देणारी बंधुता
                                                         प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून:
                                         आमच्या संविधानसभेत
                                         आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
                                         याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
                                         करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत."

सदरच्या प्रस्तावनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की संविधानाचा गाभा हे "आम्ही लोक" म्हणजे देशाचे नागरिक आहेत आणि संविधान निर्मात्यांचा दृष्टीकोन हा कायद्यावर आधारलेली लोकशाही व नागरिकांच्या हिताचे रक्षण हा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. १९४९ च्या नोव्हेंबर महिन्यात तयार झालेले संविधान हे २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले .  

यामुळेच २६ जानेवारी नुसताच सुट्टीचा दिवस नसून प्रजासत्ताक दिन म्हणून त्याला एक विशेष महत्व आहे. याच दिवशी आपले परिपूर्ण संविधान अंमलात आणले गेले. हा लेख लिहिण्याचा उद्देश हा वरवरची देशभक्ती किंवा देशाभिमान दाखविण्याचा नव्हे तर जगातील एका सर्वात मोठ्या संविधानाशी तोंडओळख करून देणे हा आहे. भारताच्या नटलेल्या विविधतेला कलात्मक आणि कौशल्यपूर्ण पध्धतीने एकत्र बांधणार्या व स्वातंत्र्याला नियमांची चौकट घालणाऱ्या एका सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेशी ओळख सोप्प्या भाषेत करून देण्याच्या उद्देशाने हा लेख लिहिलेला आहे. सुट्टीची मजा घेता घेता पुढच्या पिढीपर्यंत संविधानाचे महत्व आणि महानता पोहोचवावी या सामाजिक बांधिकलीमधून हा छोटासा प्रयत्न .

तळटीप : संविधानातील प्रत्येक परिशिष्ट, सूची हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु सदर लेखात संविधानाची मोघम माहिती सोप्या भाषेत करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.