Thursday, 30 August 2012

काही बोललो ..बरच काही बोललो नाही ..
काही शब्द सापडले . काही शोधतच बसलो ..
विचारांत फक्त घोळत बसलो ..झाले इतकेच की  ..
मी आज पुन्हा तुझ्याशी बोललो..


ओलाव्याची ती वाक्ये तर काही सापडली नाही ..
ठेवलेली टोपण नावे येहूनही आली नाही..
काही शब्द आठवून स्वतः शीच हसलो ..झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

शब्द काही आपलेसे वाटले, अर्थ मात्र अनोळखी भासले
तीच तू, तोच आवाज, बोलणे मात्र परके वाटले
पुरा.. पुरा मी आठवणीत हरवलो ... झाले इतकेच की ..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..

न बोलता सगळ ओळखणारी तू ..
आज मात्र 'आणि, अजून ,बोल ' म्हणत राहिलीस ...
थांबलेले शब्द..,अन वाढलेली अंतरे दाखवत होतीस..
न कळे , मी मात्र नवीन नात्याला नव नाव शोधात बसलो ..

झाले इतकेच की , मी आज तुझ्याशी बोललो


बोलायचे खूप होते, अनेक जाब विचारायचे होते
शब्द सगळे अडकत होते, अर्थ डोक्यात शिरत नव्हते
नकळत ती अंतरे सांधायला धावलो .. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


अस्फुट हास्य, बटांशी खेळणं, तुझं निरागस लाजण,
ती भांडण, ते रुसणं, चाफेकळी बरोबर तुझं खुलण
सार आठवून तृप्त हसलो.. झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


चाफा आजही बहरलाय, सुवास माझ्यात भरून रहीलाय
पण आजचा क्षण आपला म्हणून उमलत नाहीये
हा क्षण स्वप्नात उमलवत राहिलो ... झाले इतकेच की..
आज पुन्हा मी तुझ्याशी बोललो..


                                          ... रेश्मा आपटे आणि वैभव भानूशाली 

Friday, 17 August 2012

नकुशा


पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे मला पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. अशीच एक पत्रकार मुंबईच्या मध्य रेल्वे मध्ये हल्लीतच भेटली. खरतर संध्याकाळच्या वेळी शांतपणे झोपून किंवा फारतर गाणी ऐकत किंवा पुस्तक चाळत प्रवास कारण मला खूप आवडत. आणि मी तेच करत होते; हातातलं व. पुं. च पुस्तक चाळत स्वस्थ प्रवास करत होते. तितक्यात दादरला चढलेल्या प्रचंड गर्दीतून एक कॅमेरा आता आला, आला कसला पडलाच तो! त्यामागून चित्र विचित्र आवाज आणि धडपडतच एक २५-२७ वर्षांची सबला नारी आत आली: मध्य रेल्वे, गर्दी आणि दादरच्या डोंबारणीना (तिच्या शब्दात दादरच्या बायका). {म्हणा खरच आहे ते डोंबारी करत नसतील असल्या कसरती करत चढतात संध्याकाळच्या दादरवरून चढणार्या बायका आणि प्रवासही करतात अश्याच कसरती करत}  इंग्रजाळलेल्या मराठीत शिव्या हासडत आणि त्या कॅमेराला सावरत ती एकदाची आत आली. { प्रचंड गर्दीचा फायदा हिला कळलेलाच नाही, तिच्या धारातीर्थी पडणार्या कॅमेराला खाली पडू न देता त्या अपर दयाळू गर्दीने खांद्यावर, मांडीवर झेलल होतं. :D :D ] असो. तिला तिचा कॅमेरा सुस्थितीत मिळाल्यावर मात्र ती जरा शांत झाली. कुर्ला येईपर्यंत आजू-बाजूच्यांशी संवादही साधू लागली. तेव्हा कळल की ती सबला नारी freelancing journalist होती. 

मग माझ कुतूहल जाग झालं आणि बोलता बोलता तिच्या कॅमेरात एका "गोजीरी"शी ओळख झाली. तिच्या कॅमेरात एक विडीओ होता. ज्याची सुरुवात त्या गोजीरीच्या गोंडस आणि लोभस चेहऱ्याने होत होती. मी पटकन म्हटलं किती गोंडस पिल्लू आहे मस्त. खिन्न हसून ती मला म्हणे पूर्ण पहा की, माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे पण तुला म्हणून दाखवते पहा पहा. समजून घेशील तर खूप काही असेल नाही तर माझ्या आयुष्यातलं पाहिलं प्रोजेक्ट आणि तू एक मुलगी म्हणून पहा. त्या सुंदर गोंडस चेहऱ्याच्या मागे आवाज मधाळ बोबडा गोड आवाज. " माझ नाव नकुशा" त्या गोजिर्या चेहऱ्याच नाव नकुशा? माझ्या भुवया उंचावल्या, ती माझ्याकडे अर्थपूर्ण पहात होती. " लेक वाचवा आंदोलन ( save girl child )आणि त्याचे यश" , अमीर खान च्या 'सत्यमेव जयाते'चे पडसात आणि डॉ. चौघुले फरार या सार्यांचे साद-पडसात अश्या अनुशंगाच्या च्या काही प्रौढ आवाजातल्या ओळी आणि पुन्हा तोच लोभस निरागस चेहेरा, पण आता निर्विकार, भावना विरहीत डोळ्यात दडलेली ती बहुप्रश्नांकीत नजर काळजाला हात घालत होती! परत तोच आवाज आणि  पुढे असेच काही चेहेरे निरागस, कोवळे, मग थोडे समंजस, काही तरुण, काही सोशिक, काही गोरे, काही काळे, सगळ्यात साम्य एकाच हरवलेली आणि ना-उमेद नजर! एक छोटा विडीओ संपला. हातात कॅमेरा तसाच पकडून मी फक्त तिच्याकडे पाहिलं ती सांगत होती," आपण कोणालातरी आवडत नाही ही भावना सहन होण्याच्या पलीकडची आणि त्यात ह्या अश्या कितीतरी मुली अजून खेड्यात अश्या नकोश्या असण्याच्या भावनेने  आणि आई-वडिलांवर भार ह्या शब्दांनी दुखावलेल्या अवस्थेत दडपून  जगत आहेत. महाराष्ट्राची लेक म्हणून जन्माला यायची शिक्षा भोगत. त्यात भर म्हणून त्याचं नावच "नकुशा" ठेवण्यात येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा त्या नकोश्या आहेत ही जाणीव त्यांना करून दिली जाते. महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यात हे सर्रास चालत पण हा विडीओ आहे नवी-मुंबई मधला: वाशीचा!". ऐकून हैराण झाले मी. 

त्या मागोमाग तिने अजून एक विडीओ दाखवला. त्यात एक जन-जागृती आंदोलनातील स्वयंसेविका पोट-तिडकीने त्या झोपडपट्टीतल्या बायकाना समजावत होती. पहिली बेटी धनाची पेटी : एक मुलगी दोन घर सुशिक्षित करते, सुसंस्कारीत  करते. ' आजची मुलगी उद्याची माता आहे तिच्याशीवाय हे जग पुढे कस जाईल?  तुमचा वंश पुढे कसा जायचा? मुलगा बदलतो लग्नानंतर पण मुलगी नाही, तिच आई वडिलांच सगळ करते.. वैगरे वैगरे" ( तिचे ते सोपे आणि परखड स्पष्ट विचार ऐकून फार बर वाटत होतं )  तेव्हढ्यात एक साठीची आजी उठली, " ये बये बंद कर तुझी बडबड. चांगल-चुंगल नेसून आणि पॉटभर खौंशानी शानपन शिकीवतेस ?? कशाला ग हवीये मुलगी? खायला कहार आन आईशिला भार. नौ नाहीनं पौटात वागवायची आणि बाहीर आल्यावर द्यायची सोडून सर्वांची बोलणी खायला? की बाजारात बसवायला त्याच शंढांची पौट भराला? दिसभर राबा, आधी लेक म्हणून, मग घरवाली म्हणून मग आय म्हणून ऐका. पोरीला जनलीस तर तिथून ऐका मग तिच लगीन त्यापरीस हुंडा जमवा. बोल की." ती स्वयंसेविकाही कसलेली, " आजी तुही एक बाईच आहेस की, हेच सगळ थांबवायचं म्हणून तिला जन्माला घाला. अरे एक वेळ अशी येईल की मुलांना मुलगीच मिळणार नाही. जो पोरगा हवा ना त्याच्याच पाशी संपेल तुमच सगळ. तिला वाढवा मुलगी म्हणून प्रेमाने जवळ करा. तिला ओळख करून द्या ती ताकदवान असल्याची. मुल (son  or  boy) जन्म्लाला घालण्याच म्हशीन नव्हे.
तेव्हड्यात एक तरुण मुलगी नाही बाई उठली जवळ जवळ अंगावर खेसकली, ' कसली गो ताकद कुठूनशान येते गो? अर्ध्यापोटी दारुडा बाप चोपतो तेव्हा की घरवाला रात्र रात्र जागवतो तेव्हा? त्याच्या हाताची एक थप्पड पुरेशी होते त्वोंड गप करायला. तुम्हासनी काय जात सांगाया? लेक हवी म्हण कशाला? फक्त पोर जनायला? की घरावाल्याच्या राती सजवायला की त्याचे रट्टे झेलायला?" जोर-जोरात रडत ती सांगत होती," सत्ताईस वरीस लागल मला आता 3 पोरींची आय हाय मी धा वर्साची मोठी पॉर आता घर्वाल्याच्या डोळ्यात खुपतेय पहा म्हणे, पैका कमवायचं वय हाय तीच! बोल न कशी वाचवू म्या तिला वंगाळ नजरे पासून? इकली न्हाय तर हुंडा कुटून आणू? पैका नाय तर लगीन कोण करल ??  त्यापरीस एक पोरगा असता तर काळजी बी नाय, नी बोलणी बी नाय. माजी कूस भरून पावली असती बघ पोरीच्या काळजीन जीव तुटतो निस्ता."

त्या मागेच एका विडीओ मध्ये एक double  M  A  in psychology  मुलगी सुन्न होऊन पहात होती. रडून रडून आटलेल्या डोळ्यांतून पाण्याच्या अपेक्षेत होती. आणि बोलत होती: तिचा प्रियकर, त्याच्याशी लग्नासाठी सोडलेलं घर, त्याचं उच्चभ्रू वस्तीतल घर, गलेलठ्ठ पगार आणि संकुचित विचारसरणी.. त्याच्या आई-वडिलांच्या नातवाचा अट्टाहास आणि त्याचा  मुलगाच पाहिजे म्हणून असलेला अनाठाई हट्ट.. तिच्या मनाविरुध्ध केलेली गर्भजल परीक्षा आणि जबरदस्तीने गेलेले 3 गर्भपात. मग हट्टाने झगडून मुलीला दिलेला जन्म. बाळाच्या जन्मानंतर सगळ ठीक झाल याचा आनंद आणि तिच्या बाळाच  बारसं :) :) :) ..
आणि विडीओ च्या शेवटी एक गुलाबाच फुल त्या खाली ओळी : हिची एकाच चूक मुलीला जन्म दिला तिच्या अस्तित्वासाठी झगडली आणि तीच नाव ऐकून स्वत:च हरवून गेली. खाली त्या एम ए च नाव कै. _____ .

हा विडीओ संपेपर्यंत ठाणे जवळ आलं होतं, तशी जाता-जाता म्हटली खूप विचलित झालीस न हे पाहून हे वाचून? आहेच हे इतक भयंकर आणि मी उठवणारे आवाज या विरुध्ध. कारण मला न्याय द्यायचाय माझ्या मास्टर्स दीला आणि तिच्या गोंडस गोजिरीला. आणि म्हणून मी इतका खटाटोप करतेय ती "नकुशा" नाहीये ती  "गोजिरी" आहे... ती गोजिरी आहे.. माझ्या दीची "गोजिरी"!

ऐकून माझी गात्र सुन्न झाली ठाणे ते डोंबिवली मी या धक्यातून सावरणे शक्यच नव्हते. यंत्रवत उठले आणि चालत राहिले. घरी आले मनाच्या कप्प्यात ते गोजिर रूप कैद करून टाकल, वाटल विसरले पण छे. आज इतक्या महिन्यां नंतरही  ते पहिल्या विडीओ मधलं लोभस निरागस रुपडं आणि सासरच्यांनी मुलीला ठेवलेलं  "नकुशा" हे नाव ऐकून आणि हरून संपून गेलेली "ती" अबला काही डोक्यातून जात नाहीयेत. मागच्या काही दिवसांपासून वेळेअभावी लिखाण जरी बंद असल तरी "ती" सबला आणि तिच्या कॅमेरात चित्रबद्ध झालेली ती: अबला आणि  "नकुशा" नव्हे "गोजिरी" डोक्यातून काही जात नव्हत्या. अशा नाकुशांसाठीच्या भावना डोळ्यांतून सांडल्या तरी मनातून काही केल्या हलत नव्हत्या म्हणून आज कागदावर उतरवण्याचा हा घाट!   

                                                                                                 ... रेश्मा आपटे 

Tuesday, 7 August 2012


माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसाठी खास काहीतरी : ( स्क्राप बुक मधला एक भाग ) 
लग्नाच छोटस गिफ्ट : 1/12/2011.

हातात गुंफलेले सुंदर हात
इवल्या पावलांचे नखरे सात

अ आ इ ई, कागदाची होडी,
कधीच नाही तुटली आमची जोडी

रुसवे फुगवे आणि कट्टी बट्टी
नकळत जमली आपली गट्टी.

रींगा रींगा, गोल्स्पोट, लंगडी, कब्बडी
रडत भांडत खेळत होतो पकडा पकडी

lazy merry , गणिते, अन अल्कली,
नकाशे, सिध्द्धाता आणि सन-सनावळी,

निबंध, कविता, भरताना प्रयोगाची वही
आलीसुद्धा leaving certificate वर शाळेतून सही

पुन्हा कधी? कुठे भेटू?? डोळे पाणावले
पण "जीन्स शॉपी" ने सारे प्रश्नच सोडवले

कोलेज ऑफिस आता "तुझ्या" लग्नाची तयारी
छोटासा प्रयत्न आठवायचा शाळेची वारी...


                                                  ... रेश्मा आपटे 




Thursday, 9 February 2012

" वैसी"

 
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just  cut  U  r  self  off  from the matter and  person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life"

तो म्हणत होता ते  सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand  application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं. तरी माझ्या मित्राला, " u  r  right , i shall  keep it in mind always "  आणि तशीच वागेन असे प्रोमीस केले. त्याला प्रोमीस तर केलं आणि खरंच ठरवलं की, परत ही चूक नाही करायची, फक्त केस म्हणून बघायचं आणि involve नाही व्हायचं असं वेड्यासारख... पण!! ट्रेन सुरु झाली आणि परत एकदा ती मुलगी आठवली मला.. Prostitution , immoral  trafficking  in  woman हा प्रश्न हल्ली जास्तीच sensitive होत चाललाय. तो दलाल १०००% गुन्हेगार असतोच पण ती मुलगी??? तिचं काय??? तिला कायदा victim म्हणतो ... हो ती victimच परिस्थितीची... दुसर्याच्या हव्यासाची? पैशाच्या गरजेची? की तिच्या स्वत:च्या मोहाची? की एका पुरुषाच्या क्षणिक मस्तीची? हा प्रश्नच आहे... पण काही असलं तरी ती खरच victim!!!  

आज पण तिची बहिण मला रडून रडून सांगत होती, माझी बहिण फक्त १६ वर्षांची आहे, ती आताच मुंबईत आलीये, madam तिला बाहेर काढा ..ही बहिण .. वय वर्षे २१ च्या आस पास,..  judges म्हणे या cases मध्ये खूप sensitive असतात आणि म्हणून फक्त २१ वर्षांच्या मुलीच्या हातात victim  ची custody  देण शक्यच नाही .. ती मुलगी वाचली कारण पोलिसांनी धाड टाकली, जर नसती टाकली धाड मग?? आरोपीचा हेतू साध्य झाला असता ( विचार करून सुद्धा काटा आला अंगावर) आणि संपूर्ण आयुष्य फुकट गेल असतं. तिच्या बहिणीपेक्षा म्हणे CWC  वाले तिला सुधारू शकतील, तिची काळजी घेऊ शकतील. तिला reformation ची आणि care ची गरज आहे आणि म्हणून तिचा ताबा CWC  ला देण्यात यावा. आम्ही डोक फोडलं पण मुलीचे आई-वडील आल्या शिवाय तिचं घरी जाणं अशक्यच होतं!!!

तिची बहिण सांगत होती, ती फसलीये.. उसे हम गाव भेज देंगे। उसे छुडालो madam ... तिला समजावून आणि आई वडिलांना घेऊन ये सांगून आम्ही बाहेर पडलो. मग माझी शाळा घेतली माझ्या colleague ने पण प्रश्न नाही न सुटत तिथे,,, पुढे काय? कोणत्याही सुधार गृहात अश्या मुलांना ठेवण किती धोक्याच असतं?? खरच सुधारेल ती?? की "संगती संग दोषेण" म्हणून एक चांगला आंबा बाकीच्यांबरोबर राहून नासेल?? पोलिसांना टीप मिळाली म्हणून तिचं आयुष्य वाचल नाहीतर??  काही  दमड्यानसाठी एक मुलगी चक्क बाजारात विकायला काढली होती. नराधमांच्या हपापलेल्या नजरा आणि दलालांचा पैश्याचा हव्यास यात तिचं तारुण्य, तिचं मनं , भावना त्यांनी ओरबाडल्या असत्या. पुरशांच्या राज्यात त्या शेळीच्या पिल्लाचा नाहक बळी गेला असता. मजबुरी च्या नावाखाली स्वतःचा सौदा होताना बघतात मुली.  एकच सत्य म्हणजे शरीर!! तेच विक्रीला काढतात, पण असा भर बाजारात, लिलाव मांडतात त्यांचा.. तेव्हा .. तेव्हा खरच त्यांच्याकडे परीयायच नसतो; मुळात सगळे रस्ते बंद आहेत म्हटल्यावरच अश्या नराधमांच फावत आणि ते चक्क जिती जागती मुलगी विकण्याचा डाव खेळतात. हा, आता असतील काही मुली ह्या सगळ्याकडे easy  money  म्हणून बघत, काही तर फक्त स्वत:च्या आवाजवी इच्छा आणि so  called  गरजा भागवायला पण ह्यात पडत असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्या फक्त काही % च उरलेल्यांच काय??? 

१५ मिनिटे, फक्त १५ मिनिटे मला त्या मुलींशी बोलायला मिळाले तिच्या बरोबरची मुलगी चक्क म्हटली madamji अभी आते आते वो औरत बोली ये लडकीया "वैसी " हैं... सच हैं,  मै.. मै तो हुं ऐसी पर " वैसी" बनना किसीकी ख़ुशी नै होती। जब साला बेवडा बाप किसीको बाजार मै बिठाता हैं ना १४ बरस मै तब सिर्फ दर्द समझता हैं। तब किसीको नाही पता होता की वो "वैसी" बनने जा राही हैं। खरच तिचं दु:ख सारे बंध तोडून वाहत होतं पण डोळे कोरडे ठक्क!! एक उपभोगाची वस्तू म्हणून सतत बघितलं गेल्याची सल आणि समाजाकडून हिणवल, नाकारलं गेल्याची जखम खपली फाडून  बाहेर वाहत होती मनाला पीळ पडेल असे जळजळीत सत्य पण ती मात्र कोरडी उभी होती.
तिच्याकडे बघून वाटल ती, मी, ती समोरची judge सगळ्याच स्त्रिया जनमनाच भावनाप्रधान असलेल्या, मग ही इतकी कोरडी कशी? की जोवर बाई " वैसी" होत नाही तोवरच भाव-भावनांचं आवडंबर माजवते ??? की "वैसी" झाल्यावर गमवायला काहीच उरत नाही म्हणून भावनाच मरतात???  शेवटी तीही जिवंत माणूस आहे, स्त्री आहे तिलाही तिचं भाव-विश्व आहेच की!!  हे मला कधीच का नाही उमगल?? ती "वैसी" म्हणून हिणवायचे तरी, नाहीतर सहानुभूती (तीही किलो किलोने ) दाखवत फिरायचे (तेही समाजसेवेचा फार्स म्हणून).. का नाही त्यांना माणूस म्हणून समाजून घेत कोणी??? लहानपणापासून कोरलेले संस्कार.. परिस्थितीला शरण नाही जायचं. चारित्र्य जपायचे.. वैगरे जे पांढरपेशी तत्वज्ञान असते, ते भरल्या पोटी ऐकायला ठीक असते. पण खरंच जेव्हा जन्मदाताचं एखादीला.. त्याच भाषेत सांगायचे तर धंद्याला बसवतो तेव्हा?? जेव्हा त्या अर्धपड्या वयात पोटातली भूक बोलू लागते तेव्हा?? स्वत:चा सौदा मांडला जातो तेव्हा, कसं वाटत असेल त्या मुलीला??? आपण कधीच हा विचार करत नाही. अशी "वैसी" बनलेली स्त्री आणि तिचं अस्तित्व तिच्या समस्या कोण मनापासून समजून घेतं का?? मी तरी कधीच नाही विचार केला आजवर. पण आज करावासा वाटतोय खरंच जे आहे ते हे असे, ती अशी आहे, मग?? what  next ?? पुढे?? तिला सहानुभूती द्यायची फक्त आणि credit  घ्यायचं जसे बरेचदा घडते की तिला संधी द्यायची ?? तिचं ऐकायचे, समजून घ्यायचं नी सहानुभूती न देता तिला हिम्मत द्यायची?? पुनश्च सुरुवात करायला प्रवृत्त करायचं??? 

जिला हात हवा, तिला हात देऊन त्या दलदलीतून बाहेर काढून, मोकळा श्वास घ्यायला मदत करायची! असा 
निश्चय झाला. त्या कळीला उमलण्या आधीच, असे कोमेजून नाही द्यायचे. पण हे खरच जमेल मला? ठरलं... बाकीच्यांचं माहीत नाही पण जी हातात आहे, तिच्यासाठी काहीतरी करायचेच, मनात गाठ मारली. हा विषय आणि समस्या खूप क्लिष्ट आहेत, नाजूक आहे हा विषय!! पण विचार करायलाच हवा निदान तिच्या साठीतरी!! प्रचंड राग आणि ता मुलीसाठी काहीही न करू शकल्यामुळे आलेली अस्वस्थता सावरून, आवरून घेऊन आणि विचार "नाही" करायचा अजून असे ठरवून मी ट्रेन मधून उतरले. घरी आले तो माझ्या बेडरूम मधलं चिऊच घरटं!! आज रिकाम वाटलं, म्हणून जरा डोकावून बघते तो काय?? पिल्लं उडून घरटा ओस पडलेला. माझ्यासाठी नेहमीच अप्रूप असलेलं आणि गवत, कापूस, चार काटक्यांनी सजवून सुध्धा सजीव भासणार ते घरटं भकास, उजाड दिसत होतं. ते घरटं पाहून आज खूपच अस्वस्थ वाटलं मला!!! सहज मनात आलं, त्या मुलीच्या घरच्यांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा??? तिच्या आईच ते निगुतीन मांडलेल चार भिंतीत वसलेलं 'घरटं' ते पण असच क्षणात भकास आणि उजाड  होऊन जाईल न???? ...


                                                                                        ... रेश्मा आपटे 

Sunday, 1 January 2012

अलविदा २०११ - welcome 2012

अलविदा २०११ आणि welcome  २०१२ :)

दर वर्षीप्रमाणे यंदाही आलाच ३१ डिसेंबर .. वाजत गाजत स्वागत केलेले आणिक एक वर्ष सरले नकळत भूतकाळात जमा झाले आणि उद्या उद्या म्हणता म्हणता २०१२ वर्तमान झाले ...

खरच किती किती काय काय घडल २०११ मध्ये : ओसामा च्या वधापासून,  जपान मधली Tsunami , tim killed in libya, वगैरे राष्ट्रीय पातळ्यांवर  अशी अनेक वादळे जेव्हा धडक  देत होती भारतातही खूप काही सुरु होते : लोकपाल विधेय्यक, अण्णा हजारेंच जनव्यापी आंदोलन, आण्णा आणि टीम च्या उपोषणाच्या बदल्यात त्याना मिळालेली फक्त आश्वासने, सरकारचे नाकरते पण आणि खिसेभरू धोरण, कसाबच्या फाशीच्या शिक्षेला हाय कोर्टकडून मिळालेले confirmation, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच chewing gumसारखे चघळून चोथा झालेले गरीबी, महागाई हे प्रश्न होतेच जोडीला. एक ना अनेक घडामोडी जश्या वाईट तश्या चांगल्याही आशिया खंडात world cup चे आयोजन आणि तब्बल २७-२८ वर्षानंतर भारताने मिळवलेले जगज्जेतेपद , एक  मागे राहिलेली रुख रुख ती म्हणजे सचिनच्या शतकांची सेन्चुरी .. त्यासाठी आता २०१२ चाच मुहूर्त लागणार बहुदा,..
खूप घडामोडी, अविरत घडणारे बदल प्रचंड स्पीड ने जगणारी माणसे आणि तितकीच एक-मेकांपासून दूर जाणारी मनं !!!किती काय काय घडलाय? किती घडतंय आणि किती संकट समोर उभी आहेत..  असे असूनदेखील गत वर्षाला हासत bye  करणारे हात येत्या २०१२ ला कवेत घेण्यास सज्ज आहेतच, त्याच उत्सहात आणि आनंदात !!!


सरत्या वर्षाबरोबर अनेक कडू-गोड क्षणाच्या आठवणी झाल्या आणि आज वेळ आलीये ती नवीन संकल्पांची ,.. काल आजीची खोली तिच्याबरोबर आवरताना २ गाठोडी मिळाली त्यांनी या सत्याची अजूनच जाणीव करून दिली की उद्या कधीच उजाडत नाही कारण तो उजाडला की त्याचा आज झालेला असतो. पण "आज" चा कधी ना कधी "काल" होतोच आणि म्हणूनच जोवर "आज" आहे तोवर काम करायचे, आठवणी तयार करायच्या आणि  जेव्हा त्याच :आज" चा काल होईल तेव्हा त्या गुंफलेल्या आठवणी जपायच्या, शिकायचं त्यातून आणि पुनश्च सुरुवात करायची :) :) या वर्षी असाच काही आठवणी मी ब्लोग वर टाकणारे " गाठोड्यातल्या आठवणी " या सदराखाली ,,, आजी म्हणते ते पोचवायला किती जमेल ते माहित नाही पण प्रयत्न १०० % असेल :) नवीन वर्षाचा संकल्प म्हणू हव तर :) :)

एकुणात काय तर.. २०११ आणि २०१२ च्या उंबर्यावर असताना आज खरच वाटतंय आणिक एक वर्ष सरल खूप काही शिकवून गेल, देऊन गेल आणि एक नवीन वर्ष येतंय नवी आशा नवा उत्साह घेऊन ...
                                                                                   
                                                                                           . . . रेश्मा आपटे

Friday, 30 December 2011

मावळतीचा सूर्य

संध्याकाळी ५ ची वेळ  ...
अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते सूर्यबिंब मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ... लालसर, केशरी, पिवळे रंग कोण्या चित्रकाराने कॅव्हासवर पसरावे असे सुंदर सजलेले आकाश ,, आणि ,, आणि अवकाशातील त्या रंगात रंगलेला तो जलाशय जणू ती अद्भुत रंगांची डबी हिंदकळून रंग सांडावेत आणि पाण्यावर ते सारे पसरावेत असा नजारा !!.. आणि समुद्रात उठणार्या लाटांवर हेलकावणारे ते केशरी-लाल सूर्यबिंब !!! मंद मंद थंड हावा आणि कृत्रिम दिव्यांनी झगमगणारा तो किनारा!! हे वर्णन ऐकून  कोण्या शांत सुंदर ठिकाणचा सूर्यास्त वाटावा पण .., पण हे वर्णन आहे मुंबईच्या सूर्यास्ताचं आणि जागा ,,, marine  drives ...

गजबजलेली मुंबई.. चाकरमान्याची घराकडे पळण्याची तयारी. taxi  पासून ते फोर्ड, Mercedes  एक ना अनेक महागड्या गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवरचा "स्पीड"  !! घाई, गर्दी आणि स्पीड मुंबईची ओळख. marine drives  चे ते कट्टे... त्यांच्या एका बाजूला तुफान वेगात चाललेली आयुष्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामांना जुंपलेले मुंबईकर आणि दुसरीकडे अथांग समुद्र .. दोन्ही कडे गती..  किनर्‍या लगतच्या मोठमोठाल्या इमारती, हॉटेल्स त्याचे डोळे दिपवणारे झगमगाट आणि दुसरीकडे मास्तीत  गरजणारा समुद्र!!
marine  drives  चा हा किनारा न जाणे किती वर्षे हे अनुभवतोय??? आकाशातले सूर्याचे खेळ, लाटांचे आवाज, पाणी, चंद्राच्या कला, रात्रीचे टिपूर चांदणे आणि दुसरीकडे उन्मत्त वेग!! एकीकडे शांत आणि सुरेख निसर्ग सूर्यास्ताच्या देखाव्याने आणि रंगानी न्हालेला समुद्र, थंड मोकळा वारा आणि दुसरीकडे तुफान वेगात धावणाऱ्या गाड्या, नुकत नुकत सुरु होणार मुंबईच night  life आणि मायानगरीतल एक सत्य "पैसा बोलता है| " पण किती करंटे आपण?? हे आयुष्य जगणारे, त्या कट्ट्याना रोज पहाणारे मुंबईकर, ते मात्र त्या कट्ट्याच्या अल्याडचे आणि पल्याडचे अशी दोन्ही दृश्ये एकत्र पाहू आणि अनुभवू शकत नाहीत कारण एकाकडे पाठ फिरवल्याशिवाय दुरसे मुळात दिसतच नाही!! आणि marine drives  चा कट्टा तो... संपूर्ण गजबजाटात राहून  "स्थितप्रज्ञ " !!!

अरबी समुद्र!! शाळेत पाठ केलेला, न्यूज पेपर्स मध्ये वाचलेला, TV  वर पाहिलेला आणि प्रत्यक्षात रोजच दिसणारा..तो समुद्र !! असंख्य सूर्योदय आणि सूर्यास्त बघितलेला, पावसाळ्यात उसळणारा आणि ओहोटीला शांतपणे मागे मागे सरणारा तो मुंबईचा समुद्र... असंख्य माणसे,गजबजाट, भांडण, प्रेम, हासू तर कधी आसू पाहणारा आणि  किनर्‍यावर मायानगरीचा झगमगाट वागवणारा आणि तरीही मस्तीत गरजणारा तो अरबी  समुद्र !! तिन्ही त्रिकाळ बारा महिने मुंबापुरीला सोबत करणारा.. सकाळच्या सूर्याबरोबर खुलणारा, माध्यान्हीला तापणारा, संध्याकाळी मुंबापुरीचे चे रुपडे खुलवणारा, वातावरण फुलकीत  करणारा हा समुद्र!! मन शांत करणारा, जगण्याची उर्मी, उत्साह देणारा, प्रेमी युगुलांना खुणावणारा, मुंबईबाहेरच्या प्रत्येकाला भुलवणारा, मुंबईकरांना  अक्षरश:  रोज भेटणारा तो समुद्र... पण किती वेळा हे सौंदर्य अनुभवतो आपण??? धावून धावून दमून नेमक्या वेळेस कितीवेळा तो समुद्र आणि ते निरागस आकाश पाहतो आपण?? खरच शेजारच सौदर्य, शांतता रोजच्या रोजमार्राच्या आयुष्यात हारवून बसतो  आणि मग शोधात फिरतो शांतता आणि समाधान - मुंबई पासून लांब, गावात !!!  

जवळ जवळ रोज marine drives  च्या आस पास फिरत असतो मुंबईकर... पण..  धकाधकीच्या आणि स्पीड च्या मागे पळणारा मुंबईकर किती वेळा marine drives  च्या त्या कट्यांवर शांतपणे विसावतो आणि अनुभवतो ते सृष्टीतील बदल??? मायानगरीच्या मायेला झगमगाटाला भूललेले सारेच मुंबई येतात आणि जुंपून घेतात स्वत:ला कामामध्ये, tyaa त्या स्पीड शी cope -up  करायच्या नादात आणि छन छन करणार्या नाण्यात सुख शोधत फिंरतात. शांती, निरागस सौंदर्य आणि समाधान मुंबईत नाहीच असे बिनधास्त म्हणतात. पण मुंबईचा साधा सूर्यास्त .. इतका सुंदर निरागस नजारा मात्र अनुभवायचा विसरूनच जातात :( :( .. समुद्र पाहतो पण त्याच सौदर्य आणि असा निर्मल निखळ सुंदर देखावा तीपायाचाच विसरतो खरच फार क्वचित अनुभवलेला  असेल आपण हा नजारा !,.. मायानागारीची ही पण  एक मायाच म्हणावी लागेल का???

जिथे सुर्यास्ताचा देखावा मन भुलवून टाकणारा असा दिसतो, अश्या जगातल्या कोणत्याही जागेवर सुर्यास्ता च्या नंतर एक अनामिक हुरहूर, असह्य शांतता आणि रुख-रुख पसरते पण मुंबई?? इथला सूर्यास्त तितकाच सुंदर असतो, भुरळ घालतो, पण सूर्यास्तानंतर समुद्राकडे पाठ केली की एक वेगळंच जग समोर येत ,, किनारा अजूनही प्रकाशित असतो कृत्रिम उजेडात झगमगत असतो आणि "स्पीड" वेडा मुंबईकर त्याच वेगात कोणत्याही टोचणी शिवाय धावत असतो... हे भावना शून्य असल्याच प्रतिक म्हणायचं?? की एक मस्तवाल  attitude ??  की गरज?? उत्तर कठीण आहे. SO, तूर्तास आपण फक्त marine drives  च्या कट्ट्याच हे  नशीब म्हणू किंवा त्या कट्ट्याच वेगळेपण !!!!
काळोखाच्या गर्तेत समुद्र पूर्णपणे दिसेनासा होतो पण किनारा मात्र झगमगत असतो कृत्रिम lights च्या उजेडात,,, सूर्यबिंब संपूर्ण मावळलेलं असत पण किनारा लख्ख असतो झगमगाटात हरवलेला!!!
मुंबई धावतच असते ... समुद्र वाहतच असतो ,,, फक्त  किनार्याची , marine drives  ची एक बाजू अंधारात अदृश्य झालेली असते... मुंबई आणि बेफिकीर मुंबईकरासाठी फक्त एक working day संपलेला असतो.


                                                                                                ... रेश्मा आपटे 

Tuesday, 22 November 2011

2.30pm ची ठाणे लोकल

गेल्या आठवड्यात ठाण्यात एक काम होते म्हणून ऑफिस मधून दुपारीच निघाले. एरवी माणसांनी तुडुंब बहरून ओसंडून वाहाणारी लोकल दुपार असल्यामुळे एकदम शांत होती. first  class च्या डब्यात आम्ही ३नच जणी होतो. मस्त पाय पसरून बसले पण झोप येत नव्हती, नेहमी सारखी विचारांची तंद्री सुध्धा  लागत नव्हती :( वाटल ह्या सुख बोचत आपल्याला रोज त्या मरणाच्या गर्दीत आणि घामाच्या वासात सुद्धा झोप लागते किंवा विचारांचे चक्र सुरु असते. आज दस्तूर भी है मोका भी ( नो गर्दी + विंडो सीट)  पण झोप काही येत नाही :(

तर समोर बसलेली एक २८-२९ वर्षाची क्युट गोरीपान मुलगी हुंदके द्यायला लागली. वाटल बरे वैगरे नसेल म्हणून पाणी विचारलं पाणी प्याली तरी तेच. म्हटलं काय वैताग आहे. तर शेजारची ६० च्या आस पास ची आजी मध्ये पडली तिला सरळ विचारलं " काय आहे तुझ्या मनातला सल? आता सांगू नको  उन्हाने रापले आणि पाणी आले. हे काळ्याचे पांढरे असेच नाही झाले." तशी ती आणिकच रडायला लागली. झोप तर येताच नव्हती ( आणि दुसर्याच्या आयुष्यात डोकावणे हे सगळ्याच मुलींचे फेवरेट काम).

ती:  काय सांगू आजी. मी आता माझ्या बॉयफ्रेंड शी बोलत होते, म्हणजे X म्हणू की काय म्हणू माहित नाही कदाचित उद्या X म्हणेन पण सध्या तरी माझा बॉयफ्रेंड! ६ वर्ष आम्ही रेलातीओन मध्ये आहोत आणि आता ह्याला साक्षातकार झालाय की we dont have future together, का??? कारण आमच नातं म्हणे कांटाळवाण झालाय.( ती मध्येच थांबली काहीतरी विचार करत. सांगू नको यात अडकत कदाचित, पण बोलली, कदाचित कधीच परत आम्ही एक-मेकीना दिसणार नव्हतो म्हणून असेल) मी ,, मी ते टिकवायला असमर्थ ठरलीये तो चार्म ती ओढ मी नाही टिकवू शकले. आताच हे, मग नन्तर काय? म्हणून वेगळे होणे चांगले असे म्हणणे आहे त्याचे. खूप विनवण्या केल्यावर एक चान्स देऊयात आपल्या नात्याला म्हणतो. चान्स ??? उपकार करतोय का????? मला खरच कळत नाहीये मी कुठे चुकले? तो म्हणेल ते आणि तसेच केले नेहमी, सगळ्या adjustments केल्या, त्याच्या घराचे.. त्यांना आवडणार नाही म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी फक्त शिफ्ट्स असतात म्हणून सोडली. तर आता हा म्हणतोय, मी कमी पडल??. माझ्यातली मीच उरले नाहीये म्हणे.

आजी: मग आता पुढे काय? तुला काय हवाय तो की सुटका?? बघा बुवा तुम्हाला option  आहेत आम्हाला नव्हते असले options .

ती: अर्थात,  मला "तो " आमच नातं हवाय त्याच्या शिवाय माझ आयुष्याच नाहीये. आणि जर गेलाच दूर तर?? स्वत:ला संपवण्याची ताकद किंवा त्याला दुसर्या मुलीबरोबर बघायची हिम्मत पण नाहीये माझ्यात. मला भिती वाटते ती एकटेपणाची! तो गेला तर क्षणात मी एकटी होऊन, सगळी स्वप्न संपून जातील, एक पोकळी निर्माण होईल, त्याने विचार करायला वेळ मागितला तेव्हा वाटल जमिनीत गाडली जातेय मी, कोणीतरी मी निरुपयोगी म्हणून दूर करताय मला. मी सजीव आहे की एक वस्तू?? माझा कंटाळा आला? ६ वर्षाचं नात ३ शब्दात चुरगाळून अडगळीत कसा टाकू शकतो तो? मी खूप रडले तर उपकार केल्यासारखा एक चान्स देऊ म्हटला दोघानाही. मला भिती वाटली ती माझ्या विचारांची एकट पडण्याची!!! जगण्याचा आधार गमावण्याची. मी विचार करत बसले माझ नक्की काय चुकल? सुंदर नातं(??) माझं असं वाळूसारखं हातातून निसटताना मला कळलं कस नाही? की खरच तो म्हणतो तशीच आहे मी? साध आपल माणूस सुध्धा सांभाळता न येणारी? स्वत:त एकट जगायचा विश्वासच आणि सामर्थ्य नसलेली? त्याच्याशिवाय अस्तित्वच नसलेली? तो होता म्हणून लोक मला ओळखत होते, मी काय केलय? त्याला वेळ हवा सेटल व्हायला म्हणून जबरदस्तीने शिकत राहिले तर म्हणे फक्त शिक्षण कामच नाही व्यवहारीपणा हवा तो तुझ्यात नाही.

मी: (खरा तर तोंड उघडायची काहीच गरज नव्हती मला, ती आजीशी बोलत होती. पण गप्प बसले तर ती मी कसली नाही का? lolz ). what the hell ? तो काहीबाही बोलला आणि तू ऐकून घेतलं? का तुझ्यात हिम्मत नाही असे का वाटते तुला? चल मला एक सांग ,. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तू कमी पडलीस राईट? now, assuming without admitting, you falied in keeping the relation moving or just failed to maintain the charm in the relation rite? what did he do to maintain the same? त्याने काय इनपुट्स टाकले तुमच रीलेशन टिकवायला? ही काय फक्त तुझीच जबाबदारी आहे का? आणि... (पुढे मी स्त्रीमुक्ती वादी विचारांची यादीच वाचणार होते, तुला त्याला नियम सारखे, आणि तुझ प्रेम आहे आणि तो हवाय तर काहीतरी कर ते नातं टिकवायला पण त्याला या गोष्टीची जाणीव करून देऊनच ... हे आणि बरेच शब्द मला पड्जीभे खाली ढकलावे लागले ... कारण आजी मध्येच बोलली....)

आजी:  ( मला तोडत आजी म्हणे...) हो तुझच काम आहे. मी जबाबदारी म्हणेन. हो; आहे तुझीच कारण तुझ्यातच ती ताकद आहे आणि कलाही कारण तू मुलगी आहेस. मुलगी मुलगा यातल्या कोणत्याही वादात मला अडकायचं नाही. तुम्ही तरुण मंडळी जे स्त्री-पुरुष समानता म्हणता ते पटत मला पटत पण...
नाती जोडायची असतात. ती जोडायलाही कमी वेळ लागतो तोडायला तर क्षणाचा ego पुरतो पण ती नाती संभाळण (maintain )कारण महत्वाच!!! ते कोणी शिकवत नाही कोणतेही पुस्तक किंवा शाळा-कोलेज तुम्हाला हे शिकवणार नाही ते आपण अनुभवातून शिकायचं असतं. नाती जपण हे मुलीना आपसूकच येत. आणि ह्या अश्या नाजूक नात्यांना तर फारच जपावं लागत, फुलवावं लागतं. स्वत:च अस्तित्व विसरून निष्ठा विसरून त्याला महत्व द्या म्हणत नाही पण "आयुष्य म्हणजे तारेची कसरत असते एक पाऊल चुकलं न की सगळा खेळच उध्वस्त होतो". माझे विचार तुम्हाला पटणार नाही म्हातारे वाटतील माझ्यासारखेच!! पण एक लक्षात ठेवा नाती ही "रेसिपी" सारखी असतात.
फोडणीत जसे मोहरी, मिरची मीठ बरोबर पडावे लागते ना?  त्याला चव यायला? आणि नंतर ती डीश सजवाविपण लागते तरच ती खावीशी वाटते आणि या सगळ्यात एक सेक्रेट गोष्ट सुधा असते ते म्हणे प्रेम, मन तो पदार्थ तुम्ह्च्या भाषेत perfect  होण्यासाठी :)
हा तर तसेच असते नात्याचे, भांडू नका असे नाही म्हणणार मी; कारण, त्यानेच जीवनाला रंगत येते. जेव्हा तुमची चहाच्या पेल्यातली भांडणे कमी होतील किंवा बंद होतील तेव्हा समजा की तुमच आयुष्य खूप निरास तरी झालाय किंवा जागून पूर्ण तरी झालाय चला निजधामाला (amazing आजी भारीच बोलत होती. आम्ही दोघी ऐकत होतो फक्त) हा तर, नातं जपायचं असत गुलाबाच्या फुलासारखं. चूक कोणाची याची उत्तर भांडण झाल्यावर लगेच नाही शोधायची!, ते मिटवायचं आणि मग शांतपणे चूक दाखवायची समोरच्याला!!. वेळ द्यायचा आणि  घ्यायचाही!!  घाईत काहीच निर्णय नाही घ्यायचा. हे नातं खरच नाजूक असतं!! ते तसच ताज तवान रहाण्यासाठी थोडासा बदल महत्वाचा असतो., Surprise  का काय म्हाणताना तुम्ही लोकं ते द्यायचे. कधी वागणं  तरी कधी दिसणं-नेसण थोडस बदलायचं. स्वत:ला त्याच्यासाठी बदलायचं पण अस्तित्व कायम ठेवून,  आपल्या निष्ठा जपून.

 तुझ्या बाबतीत मी म्हणेन तुला आधी स्वत:च्या नजरेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. त्याने वेळ दिलाय चान्स दिलाय तो सकारात्मक घे असा विचार कर की त्यामुळे तुझा आत्मविश्वास गेलाय तो परत मिळेल तुलाच! आणि एकदा तो मिळाला की तुझा "तो" कुठे जात नाही. तू जो निर्णय घेशील त्याच्याबद्दल तो आत्मविश्वास  परत मिळाल्यावर तो जो काही असेल तो असो., पण मुलीनो तुम्हाला कितीही बोर ,,, असेच म्हणता न तुम्ही लोक ते तसे वाटले तरी ऐका, ही नाती प्रेमात गुंफायची असतात. लगाम ठेवायचा प्रयत्न केलात तर सुटलाच सर्व हातून. बेदी घालायची नवर्याला पण ती मनाला त्याच्या पायात नाही!! किती खेचायच आणि कुठे सोडायचं हे कळले ना की सगळे काही सोपे होऊन जाते बघा!! आणि हेही खरच आहे ग बायानो. सगळ काही मुलीच्या हातात असते. नाते जपणे पण आणि ते तोडणे पण!! सीता-द्रौपदी मुळे रामायण महाभारत घडत आणि जिजाई मुळे शिवाजी.!!  दुर्गा, राणी लक्ष्मिबाई सगळे तुझ्या-माझ्यात असतातं गरज असते ती स्वत: वरल्या विश्वासाची!!

प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, थोडी तू-तू मै-मै, थोडी माघार, थोडा आक्रमक पणा, थोडासा attitude and ego , कधी तुझ म्हणण तर कधी त्याच बरोबर, खूप सामंजस्य आणि प्रचंड विश्वास बस; नातं PERFECT!!!

हे इतक आणि बराच काही समजावलं मी माझ्या लेकीला जर तिला नात्यांची किंम्मत, त्यातली गंम्मत आणि ते जपायची कला जमली असती ना??? .. तर,,, आज तिचं लेकरू पोरकं नसतं झालं.

(सुन्न झाले मी... ही बाई सोयर-सुतक नसताना स्वत:हून विचारते काय आणि सगळ बोलते काय. का कशासाठी??? त्या मुलीला मोकळ करण्यासठी?? की.. की स्वत:च दुख: हलक होण्यासाही?? ... मुंबईची लोकल आणि त्यातला अजून एक चेहेरा.... )

तेव्हड्यात ठाणे आले. आम्ही तिघीही उतरलो. तीन दिशांना चालत सुटलो मागे वळूनही न पहाता. परत एक-मेकींसाठी तितक्याच अनोळखी आणि detached होतं.गर्दीत मिसळत गेलो धूसर होत गेलो एक-मेकिंपासून दूर पण गर्दीत... कदाचित एकटेपणाची भीती असेल अजून मनात कुठेतरी तिघींच्याही!! आम्ही तिघी आता अनोळखी होतो, चेहेरे विसरणार होतो पण,,, विचार , त्याला चेहर्याची आणि ओळखीची गरज नसते तो डोक्यात रहाणार कायमचा!!.. आणि सोबतीला होता एक विश्वास! आजीनं दिलेला, स्वत: समर्थ असण्याचा.
                                                                                       
                                                                                                 
                                                                                                ...  रेश्मा आपटे